येरवड्यातील लहान मुलांच्या कोविड रुग्णालयाच्या ऑक्सिजन प्लॅन्टचे काम रखडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

oxygen bed
येरवड्यातील लहान मुलांच्या कोविड रुग्णालयाच्या ऑक्सिजन प्लॅन्टचे काम रखडले

येरवड्यातील 'लहान मुलांच्या कोविड रुग्णालयाच्या' ऑक्सिजन प्लॅन्टचे काम रखडले

लोहगाव : पुणे महापालिकेच्या येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयाचे रूपांतर लहान मुलांच्या सुसज्ज अशा दोनशे बेडच्या कोविड रुग्णालयात करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र प्रशासनाने 'ऑक्सिजन प्लॅन्ट'(Oxygen plant)साठी निवडलेल्या जागेला स्थानिक नगरसेवकाने विरोध केल्याने, मागील अनेक दिवसांपासून येथील ऑक्सिजन प्लॅन्टचे काम रखडले आहे. राजीव गांधी रुग्णालयात मुलांचे कोविड सेंटर (Covid Center)सुरू करण्यासाठी येथील बाह्य रुग्ण विभाग, एचआयव्ही विभाग, क्षयरोग विभाग, प्रसूतीगृह इत्यादी २७ विभागांचे पालिकेच्या इतर रुग्णालयात स्थलांतर करण्यात आले आहे. त्यानंतर राजीव गांधी रुग्णालयाच्या अंतर्गत भागात आवश्यक ते बदल करून मुलांचे कोविड रुग्णालय तयार करण्यात येत आहे.

हेही वाचा: आंतरराष्ट्रीय विमानतळ खेड तालुक्यातच करा!

हे रुग्णालय चार मजली असून प्रत्येक मजल्यावर सर्वसाधारण, आयसीयू, ऑक्सिजन बेड अशा वेगवेगळ्या सुविधा असलेल्या बेडचे कक्ष (वार्ड) तयार करण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक असलेल्या यांत्रिक उपकरणे मागवण्यात आली आहेत. ही उपकरणे लवकरच बसवण्यात येतील. तर रुग्णालयातील अंतर्गत ऑक्सिजन पाईपलाईनचे कामही सुरू करण्यात आले आहे. मात्र ऑक्सिजन प्लँटचेच काम रखडल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. याबाबत माहिती देताना विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल म्हणाले, की राजीव गांधी रुग्णालयालगतच्या कर्नल यंग विद्यालयात ऑक्सिजन प्लॅन्टचे काम काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र स्थानिक नगरसेवक संजय भोसले यांनी त्याला विरोध केल्याने हे काम बंद करण्यात आले. या कामाला लागणाऱ्या जागेमुळे खेळाचे मैदान कमी होऊन विद्यार्थ्यांची अडचण होईल, असे भोसले यांचे म्हणणे आहे. तर रुग्णालयाच्या जागेतच खाजगी मेडिकल दुकान आहे. ती जागा घेण्याचा प्रयत्न झाला, मात्र सदर दुकानमालक न्यायालयात गेल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट होऊन, तो प्रस्तावही बारगळला. याबाबत चर्चा करून लवकरच योग्य मार्ग काढण्यात येईल.

हेही वाचा: पानिपत मोहिमेत पवन मावळातील तीन पिढ्या ; कोरोनाच्या वाढत्यासंख्येमुळे ५० जणांचा सहभाग

नगरसेवक संजय भोसले यांच्याकडे चौकशी केली असता, विद्यालयाच्या आवारात ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यास आपण विरोध केला असल्याचा त्यांनी कंदूल यांच्या विधानाला दुजोरा दिला. त्यांनीही विद्यालयाच्या आवारात हे काम केल्यास विद्यार्थ्यांना अडचण होणार असल्याचे म्हटले. त्यामुळे याबाबत पालिका प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, हे येणारा काळच ठरवेल. मात्र जसजसा काळ जातोय, तशीच ओमीक्रॉनच्या (omicron)रुपात आलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागून राजीव गांधी रुग्णालयाचे मुलांचे कोविड रुग्णालयात रूपांतर होऊन येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी हे रुग्णालय तयार असले पाहिजे, अन्यथा यासाठी केलेल्या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top