शहरातील कामगारांचे प्रश्‍न तडजोडीने सोडवू - बापट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कामगार प्रलंबित प्रश्‍नाबाबत न्यायालयात गेले आहेत. मात्र, त्यासंदर्भात पुढील महिन्यात बैठक घेऊन तडजोडीने कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यात येतील, असे आश्‍वासन अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी थेरगाव येथे दिले.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कामगार प्रलंबित प्रश्‍नाबाबत न्यायालयात गेले आहेत. मात्र, त्यासंदर्भात पुढील महिन्यात बैठक घेऊन तडजोडीने कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यात येतील, असे आश्‍वासन अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी थेरगाव येथे दिले.

पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघातर्फे थेरगाव येथील शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन बांधण्यात येणार आह. त्याचे भूमिपूजन बापट यांच्या हस्ते झाले. महापौर नितीन काळजे, खासदार श्रीरंग बारणे व अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप व ऍड. गौतम चाबुकस्वार, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत झिंजुर्डे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

बापट म्हणाले, 'परदेशात कामगार संप करत नाहीत तर उपाशी राहतात. काळ्या फिती लावतात. मत परिवर्तन करण्याचे प्रयत्न करतात. मात्र, आपल्याकडील डाव्या आघाडीच्या कामगार संघटना तसे करत नाहीत. त्यामुळे देशात व राज्यात हजारो कारखाने बंद पडले असून उत्पादन थांबले आहे.''

खासदार साबळे म्हणाले, 'महापालिकेत कायमस्वरूपी कामगारांपेक्षा मानधनावरील कर्मचारी जास्त आहेत. पिंपरी-चिंचवड शहराचे वैभव हे कामगारांच्या घामातून निर्माण झाले आहे. त्यामुळे कामगारांच्या हिताचा विचार होणे गरजेचे आहे.''

शशिकांत झिंजुर्डे यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. हनुमंत लांडगे यांनी आभार मानले.

Web Title: worker issue solution girish bapat