पैसे गेले अन् गाडीही सुटली; परराज्यातील कामगारांवर भामट्यांमुळे आली ही वेळ!

Migrant-worker
Migrant-worker

पुणे : अचानक पुकारण्यात आलेला लॉकडाउन. त्यामुळे रोजगारावर आलेली गदा. हाताला काम नसल्याने खाण्याची मारामार. त्यामुळे आहे त्या पैशात सहकुटुंब आपल्या गावी जायचे या आशेत असलेल्या परराज्यातील कामगारांची माणुसकीचा लवलेशही नसणाऱ्या भामट्यांकडून फसवणूक होत आहे. त्यामुळे काबाडकष्ट करून पै-पै जमा करणाऱ्या या कामगारांचे मानसिक खच्चीकरण होत असून आमच्यावरच ही वेळ का? या प्रश्नाने ते आगतिक होत आहेत.

शहरात विविध ठिकाणी अडकलेल्या कामगारांना त्यांच्या गावी जाण्यासाठी प्रवासाचा पास किंवा रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळवून देतो, असे आमिष दाखवून शेकडो कामगारांची आत्तापर्यत फसवणूक झाली असून याबाबत दोन गुन्हे देखील दाखल आहेत.

कामगारांच्या अज्ञानाचा फायदा : 
'अडला हरी गाढवाचे पाय धरी' ही म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे. अशीच काहीशी अवस्था या कामगारांची झाली असून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत हे भामटे त्यांना गंडा घालत आहे. काही पण करा पण आमचा गावी जाण्याचा मार्ग मोकळा करा, अशी एकच आशा घेऊन कामगार या लबाडांकडे जातात. मात्र त्यांना फसवणूक आणि त्यातून झालेल्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल, याची कल्पना देखील त्यांच्या मनात येत नाही.

जस्ट डायलवर नंबर : 
एखाद्याची गरज आणि त्याच्या अज्ञानाचा फायदा घ्यायचा असेल तर तंत्रज्ञान स्नेही व्हावे लागेल, याची पूर्ण कल्पना असलेले हे भामटे जस्ट डायलचा फायदा घेत आहेत. पास किंवा रेल्वे तिकीट कोण काढून देईल? याची जस्ट डायलवर माहिती घेतली असता मिळणारे नंबर हे या लबाडांचे असल्याचे नुकत्याच झालेल्या एका कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. 

पोलिसच झाले मजूर : 
आरोपी ज्या प्रमाणे मजूरांना जाळ्यात खेचत होता, त्याप्रमाणे पोलिसांनी देखील मजूर बनून जस्ट डायलवर लाॅकडाऊनच्या काळात रेल्वे बाबत चाैकशी केली. त्यावेळी पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या एकाचा नंबर मिळाला. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडे संपर्क साधला. त्यावेळी त्याने दीड ते दोन हजार रुपये घेऊन श्रमिक रेल्वेचे आरक्षण करून देतो असे सांगितले. ठरल्याप्रमाणे पोलिस त्याला भेटले. त्याने पैसे घेऊन पोलिसांना रांगेत उभे केले. त्यानंतर कोणी पाहत नाही हे हेरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून बेड्या ठोकल्या. त्याने अशा प्रकारे किती मजूरांची फसवणूक केली आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. 

तक्रार न करताच परतले : 
लूट झालेल्या कामगारांचा आकडा शेकडोंच्या घरात असला तरी प्रत्यक्षात दोनच तक्रारी दाखल झाल्या आहेत. कारण तक्रार दाखल केल्यावर  त्याचा पाठपुरावा कोण करणार. त्यापेक्षा गेलेले पैसे सोडून द्या आणि पुन्हा प्रयत्न करा, मनस्थितीतून अनेक कामगारांनी तक्रारच केली नाही. त्यामुळे आरोपींचे फावले आहे. मात्र आरोपींवर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. 

साहेब, आत्ताच सुरुवात केली :
कामगारांचा गैरफायदा घेणाऱ्यांची टोळी सक्रीय आहे का? याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. शनिवारी केलेल्या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सांगितले की, साहेब मी अशा पद्धतीने फसवणूक करण्यास आत्ताच सुरुवात केली आहे. मात्र त्याचे कोणी साथीदार आहेत का? याचा देखील पोलिस तपास करत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कामगारांची फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. याबाबत आत्तापर्यत बंडगार्डन आणि हडपसर पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी. 

- बच्चन सिंग, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com