#Worldhandicappedday जगण्याच्या आभाळात ऊर्मीचं चांदणं! (व्हिडिओ)

गायत्री तांदळे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

आत्ताच्या तरुणाईने छोट्या छोट्या गोष्टींवर हार न मानता लढायला शिकले पाहिजे. तसेच, आपल्याला शक्‍य होत असेल तेव्हा समाजसेवेच्या कार्यात भाग घ्यावा. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये रॅम्प असावेत.
- सोनल पाटील

जिवनात कधीही हार मानू नका. कितीही संकटे आली तरी जिद्दीने उभे राहा. आयुष्यातील प्रत्येक समस्येतून बाहेर पडण्यासाठी मार्ग असतो. लोक काय बोलतील यापेक्षा आपल्याला जे योग्य वाटत तेच करा.
- श्रद्धा तिकोणे 

पुणे - ‘भलेही नियती आमच्याशी निष्ठुर झाली असेल; पण जे वाट्याला आलंय, ते तर भोगलंच पाहिजे. त्यानं खचून जाऊन चालणार आहे का..?’’ दुर्दम्य आशावाद व्यक्त करणारा हा सवाल आहे. जन्मापासूनच दिव्यांगत्वाशी दोनहात करणाऱ्या सावित्रीच्या दोन लेकींचा. ‘आमच्या जिद्दीला तुमची सोबत असेल, तर आम्ही कशातच कमी नसणार,’ हा त्यांच्या शब्दांतून पाझरणारा धीरोदात्तपणा साऱ्यांच्याच मनाला उभारी देतोय... जगण्याला बळ देतोय.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

जन्मतःच दिव्यांगत्व वाट्याला आलेल्या या सावित्रीच्या लेकी आहेत सोनल पाटील आणि श्रद्धा तिकोणे. मंगळवारी (ता. ३) जगभरात साजऱ्या होत असलेल्या दिव्यांग दिनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती ती जगण्याची ऊर्मी अन्‌ दुर्दम्य आशावाद. दिव्यांगत्वाच्या वेदनेचा लवलेश कुठेच नव्हता. ना बोलण्यात, ना मुखावर!

बहुचर्चित रामटेक बंगला पुन्हा भुजबळांकडे; पाहा कोण कोठे राहणार

सोनलला कंबरेपासून खाली कोणतीच हालचाल करता येत नाही. एका जागेवरून दुसरीकडे जायचे असले किंवा व्हीलचेअरवर बसायचे असले, तरी शक्‍य नाही. त्यासाठी घरच्यांची मदत घ्यावी लागते. ती मदत अन्‌ स्वतःतील जिद्दीच्या जोरावर ती आज कला शाखेचे तृतीय वर्षाचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत आहे. शिक्षणाबरोबरच तिने चित्रकलेचा छंद जोपासलाय. फावल्या वेळेत तिने रेखाटलेली चित्रे सर्वांनाच आनंद देऊन जातात. त्याचबरोबर विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेऊन या स्पर्धांमध्येही तिने यश मिळविले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना मदत मिळावी, यासाठीही ती सातत्याने प्रयत्न करीत असते.

पंकजा यांच्या पक्षांतराच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण 

कुटुंबीयांच्या मदतीने श्रद्धाने आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिक्षण घेतल्यावर घरी बसून न राहता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनायचा चंग बांधून तिने एका नामांकित कंपनीत मुलाखत दिली. तिच्याकडे संवादाचे उत्तम कौशल्य असल्याने तिची ग्राहकसेवेकरिता निवड झाली. सध्या ती स्थानिक व जागतिक पातळीवरील ग्राहकसेवेचे काम यशस्वीरीत्या पाहत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World handicapped day life