शहरातील हौशी रंगकर्मी करताहेत रंगभूमीची सेवा

शहरातील हौशी रंगकर्मी करताहेत रंगभूमीची सेवा

पिंपरी - ‘एक तरी अंगी असू दे कला। नाहीतर काय फुका जन्मला...।’ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वचनाप्रमाणे अनेक जण जगत आहेत. त्यांनी कलेला महत्त्व दिले आहे. कुणी चित्रकार आहे, तर कुणी गायन, वादन आत्मसात केले आहे. कुणी नृत्य, तर कुणी अभिनय करीत आहे. या कला सादर करण्याचे व्यासपीठ म्हणजे रंगभूमी. या रंगभूमीचा देशातच नव्हे, तर परदेशातही गवगवा आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघानेसुद्धा (युनो) त्याची दखल घेतली आणि युनेस्कोच्या (संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, शास्त्रीय, सांस्कृतिक संस्था) इंटरनॅशनल थिएटर इन्टिट्यूटने १९६१ मध्ये २७ मार्च हा जागतिक रंगभूमी दिन जाहीर केला. तो बुधवारी (ता.२७) आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शहरातील हौशी कलाकारांशी संवाद साधला. ‘एक तरी अंगी असू दे कला...,’ याच भावनेतून हे कलाकार रंगभूमीची सेवा करीत असल्याचे त्यातून समोर आले. 

अभिनयाचे मोफत धडे
कर्करोगावर मात करून तब्बल नऊ नाटकांचे लेखन, दिग्दर्शन करून अभिनय केलेले नितीन सुतार म्हणाले, ‘‘तरुणांनी नाटकाकडे आकर्षित व्हावे, रंगभूमीची सेवा करावी, या उद्देशाने नवख्या मुलांना मोफत अभिनय शिकवतो. त्यांना सोबत घेऊन गेल्या २० वर्षांपासून रंगभूमीची सेवा सुरू आहे. कोल्हापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड आदी ठिकाणी एका दिवसात सलग सहा नाटकांचे प्रयोग केले आहेत. त्यांच्या माध्यमातून हुंडाबळी, व्यसनाधीनता, मनोरुग्णांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन, ज्येष्ठ नागरिकांची व्यथा, अशा वेगवेगळ्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रबोधनातून मनोरंजन हाच तर रंगभूमीचा खरा उद्देश आहे.’’

ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग
साठ वर्षांवरील हौशी कलाकार घेऊन नाटकांचे विविध प्रयोग गेल्या तीन वर्षांपासून करीत आहे. गेल्या वर्षी ‘आई रिटायर होतेय’ या नाटकाचा प्रयोग केला. यंदा ‘कुर्यात सदा टिंगलम्‌’ नाटक सादर करणार आहोत. त्याची तालीम सुरू आहे. रविवारी (ता.३१) निगडी- प्राधिकरणात नाटकाचा प्रयोग होणार आहे, असे ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन रंगभूमीची सेवा करणाऱ्या व साहित्यातील पीएच. डी.  मिळविलेल्या डॉ. ज्योती इंगोले यांनी सांगितले.

मनोरंजनातून प्रबोधन
पेशाने भूलतज्ज्ञ असलेले, परंतु आता पूर्णपणे रंगभूमीची सेवा करण्याचा संकल्प केलेले डॉ. संजीवकुमार पाटील म्हणाले, ‘‘मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न अथर्व थिएटर्सच्या माध्यमातून करीत आहे. ‘अथर्व’चे सर्व कलाकार वैद्यकीय व्यवसाय सांभाळून कला जोपासत आहेत. भूलशास्त्रावर आधारित ‘भूलसम्राट’ या नाटकाच्या माध्यमातून रसिकांच्या मनावरील ताण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या क्षयरोगाबाबत प्रबोधन व्हावे यासाठी लिहिलेल्या नाटकाची तालीम सुरू आहे. जुन्या कथा नाटकाच्या स्वरूपात आणून रसिकांपर्यंत पोचविण्याचा विचार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com