पुणे : मतदारयाद्यांच्या असंबंध तोडफोडीने इच्छुकांचे धाबे दणाणले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wrong forming of ward of Pune Municipal Corporation Voters in other ward voter lists issue pune

पुणे : मतदारयाद्यांच्या असंबंध तोडफोडीने इच्छुकांचे धाबे दणाणले

पुणे : पुणे महापालिकेची प्रभाग रचना करताना चुकीच्या तोडफोड केल्याचे समोर आले होते. आता प्रारूप प्रभाग रचना करतानाही एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात टाकणे, काही याद्या गायब होणे असे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. धायरी आंबेगाव प्रभाग क्रमांक ५४ मध्ये तर तब्बल १ लाखापेक्षा जास्त मतदारांचा प्रभाग झाल्याने इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. या मतदार याद्या दुरुस्त केल्या नाहीत तर याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा इच्छुकांनी दिला आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. त्यावर १ जुलैपर्यंत हरकती सूचना नोंदविता येणार आहेत. प्रभाग रचना अंतिम झाली तरी ल्याने राजकीय पक्ष, इच्छुकांकडून प्रभागाचा अभ्यास सुरू आहे. ज्या ठिकाणी हक्काचे मतदान आहे त्यासह अवघड भाग कोणता तेथे लक्ष घालत आहेत.

पण प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिरूर मतदारसंघातील व पुणे महापालिकेच्या हद्दीबाहेरील वढू या गावातील १२५ पेक्षा जास्त मतदारांचा समावेश प्रभाग क्रमांक दोनमध्ये करण्यात आला आहे. अनेक प्रभागाच्या सीमेवरील मतदारांची विभागणी होण्याऐवजी प्रभागाच्या मध्य भागात असलेले मतदार दुसऱ्या प्रभागात टाकले आहेत. प्रभाग क्रमांक ३६ कर्वेनगर येथील सोसायट्यांमधील मतदार प्रभाग क्रमांक १६ फर्ग्युसन महाविद्यालय- एरंडवणे येथे जोडले आहेत. प्रभाग क्रमांक शनिवार पेठे-नवी पेठेतील काही मतदार प्रभाग क्रमांक ५२ सनसिटी-नांदेड सिटीमध्ये टाकले आहेत. एका मतदारयादीत १ हजार ते १२०० मतदार असतात. काही प्रभागात चार ते पाच तर काही प्रभागात १० ते १५ मतदारयाद्या दुसऱ्या प्रभागात केले आहेत. अशा प्रकारे बहुतांश सर्वच प्रभागातील याद्यांमध्ये घोळ झाला आहे. प्रभाग रचनेत आपल्या सोईचा प्रभाग झाला असे वाटणाऱ्या इच्छुकांचे हक्काचे मतदार गायब झाल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.

‘‘मतदार याद्या बिएलओ शिवाय केल्या आहेत. मतदार याद्यांशी तांत्रिक संबंध नसलेल्या लोकांकडून मतदार याद्या फोडल्या आहेत. त्यामुळे मोठ्याप्रमाणात चुका झाल्या आहेत. आमच्या प्रभागातील मतदार बाहेर गेले आहेत. बाहेरचे मतदार प्रभागात आले आहेत. अंतिम मतदार यादी करताना यात बदल झालाच पाहिजे.’’

- विशाल तांबे, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस

‘‘प्रभाग क्रमांक ५२ मधील सनसिटी भागातील चार ते पाच याद्या वडगाव येथे प्रभाग ५१ला जोडल्या आहेत. तर राजेंद्र नगर, संत सेना पेठ येथील मतदार ५२ ला जोडले आहेत. चुकीच्या पद्धतीने याद्या फोडल्याचा फटका निवडणुकीत बसू शकतो. त्यामुळे त्यावर हरकती नोंदविल्या जातील. वेळ पडली तर न्यायालयातही जाऊ.’’

- दीपक नागपुरे, सरचिटणीस, भाजप

‘‘अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणे मतदार याद्या फोडल्याने धायरी, आंबेगाव, निंबाळकरवाडी यासह इतर भागातील याद्या जोडल्याने प्रभाग क्रमांक ५४ धायरी आंबेगावचे मतदार १ लाखाच्यापुढे गेले आहेत. त्याविरोधात हरकत नोंदविली जाणार आहे. आमच्या प्रभागाशी संबंध नाही त्या याद्या काढून टाकाव्यात.’’

- काका चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: Wrong Forming Of Ward Of Pune Municipal Corporation Voters In Other Ward Voter Lists Issue Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..