बारावी प्रवेश महाविद्यालय स्तरावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

अकरावी उत्तीर्ण झाल्यानंतर बारावीसाठी दुसऱ्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल, तर त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सहा निकष निश्‍चित केले आहेत. या बदलाबाबत कार्यवाही करण्याचे अधिकार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.

पुणे - अकरावी उत्तीर्ण झाल्यानंतर बारावीसाठी दुसऱ्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल, तर त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सहा निकष निश्‍चित केले आहेत. या बदलाबाबत कार्यवाही करण्याचे अधिकार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांकडून दरवर्षी बारावीसाठी कनिष्ठ महाविद्यालय बदलून देण्याची मागणी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे केली जाते. या बदलाची शहानिशा करून संबंधित संस्थेला पत्र दिले जात होते. आता एखाद्या विद्यार्थ्याने अकरावीनंतर बारावीसाठी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याची मागणी केल्यास प्रवेश देण्याचा निर्णय संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या स्तरावर करता येणार आहे. शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी यासंबंधीचे आदेश सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिले आहेत. 

बारावीला दुसऱ्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी सहा निकष निश्‍चित केले आहेत. त्यानुसार सध्या शिक्षण घेत असलेले महाविद्यालय लांब असेल, पालकांची दुसऱ्या गावाहून पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात बदली झालेली असेल किंवा वैद्यकीय कारणास्तव महाविद्यालय बदलून हवे असेल, शाखा बदलून हवी असेल, विद्यार्थ्यांचा राहण्याचा पत्ता बदलला असेल आणि बारावीमध्ये शिक्षण मंडळ (बोर्ड) बदलायचे असेल; तर विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदलून मिळणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण उपसंचालकांकडे जाऊन त्यांची परवानगी घेण्याची गरज नाही.

विद्यार्थ्यांना महाविद्यालय स्तरावर बारावीला प्रवेश देताना त्‍यांनी अकरावीला केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे ऑनलाइन प्रवेश घेतला आहे का, याची खातरजमा करावी. त्याच विद्यार्थ्यांना बारावीसाठी प्रवेशित करण्याची खबरदारी महाविद्यालयांनी घ्यावी.
- मीनाक्षी राऊत, शिक्षण उपसंचालक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: XII entrance college level