
बारामतीकरांचा नोएडात भीषण अपघात; सुप्रिया सुळेंनी योगींना केली मदतीची विनंती
बारामती : चारधाम यात्रेसाठी निघालेल्या यात्रेकरूंच्या बोलेरो गाडीला नोएडा नजीक झालेल्या अपघातात बारामतीतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. कर्नाटकमधील एका महिलेचाही यात मृत्यू झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनीही मृतदेह नोएडाहून बारामतीला आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. सुप्रिया सुळे यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना या संदर्भात विनंती केली आहे.
या गाडीतून सात जण प्रवास करीत होते, त्या पैकी पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून अपघातग्रस्त गाडीचा चालक गंभीर जखमी आहे. गाडीमधील आणखी एक महिला गंभीर जखमी झाले आहेत.(Yamuna Express Way Accident 4 Killed In Baramati)
हेही वाचा: पुण्यात किडनी रॅकेटचा पर्दाफाश, रुबी हॉलच्या १५ जणांवर गुन्हा
चारधाम यात्रेसाठी एकूण पन्नास लोक महाराष्ट्रातून निघाले होते. काल रात्री वृंदावन या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला. आज पहाटे साडेचार वाजता ते दिल्लीकडे जाण्यासाठी निघाले होते. नोएडा नजीक जेवर या गावा जवळ डंपरला बोलेरो गाडीने मागून जोरदार धडक दिली.
यामध्ये बारामतीतील चंद्रकांत नारायण बोराडे, सुवर्णा चंद्रकांत बोराडे हे दांपत्य, रंजना भरत पवार व मालन विश्वनाथ कुंभार या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
हेही वाचा: यमुना एक्सप्रेसवेवर अपघात, पुण्यातील पाचजण जागीच ठार, २ गंभीर
या गाडीचा चालक नारायण कोळेकर (रा. फलटण, जि. सातारा) गंभीर जखमी झाला असून त्याला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. नोएडामधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याव्यतिरिक्त सुनिता राजू गस्टे ही चिकोडी (कर्नाटक) ही महिला या अपघातात जखमी झाल्या आहेत. आज पहाटे साडेपाचच्या दरम्यान हा गंभीर अपघात झाल्याची माहिती आहे.
दरम्यान बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून या प्रवाशांनी अपघातग्रस्तांना अपघात झाल्यानंतर मदत केली. मात्र अपघात अतिशय भीषण होता त्यामुळे चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अपघाताची दखल घेतली असून दिल्लीमध्ये यंत्रणेला मदतीचे आदेश त्यांनी स्वतः दिले आहेत. स्वतः अजित पवार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
Web Title: Yamuna Express Way Accident 4 Killed In Baramati Supriya Sule Appeals To Yogi For Help
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..