यशवंतरावांमुळे शिक्षण क्षेत्राला चालना - श्रीनिवास पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

तळेगाव दाभाडे - स्व. यशवंतराव चव्हाण यांनी जाणीवपूर्वक राबविलेल्या शैक्षणिक धोरणामुळे ग्रामीण महाराष्ट्राचे स्वरूप बदलले. त्यांनी बसविलेली महाराष्ट्राची घडी आजही उचकटलेली नाही, असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी येथे केले.

तळेगाव दाभाडे - स्व. यशवंतराव चव्हाण यांनी जाणीवपूर्वक राबविलेल्या शैक्षणिक धोरणामुळे ग्रामीण महाराष्ट्राचे स्वरूप बदलले. त्यांनी बसविलेली महाराष्ट्राची घडी आजही उचकटलेली नाही, असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी येथे केले.

इंद्रायणी महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित मावळ भूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे उद्‌घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. यशवंतराव चव्हाण एक अलौकिक व्यक्तिमत्त्व या विषयावर पहिले पुष्प गुंफताना पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांची कल्पकता, प्रसंगावधान, साधी राहणी, दूरदृष्टी आदी स्वभाव पैलू हळूवार उलगडले. त्यांच्या जन्मापासून निधनापर्यंतचा अखंड त्यागाचा प्रवास पाटील यांनी कथन करताना अनेक प्रसंग उलगडले. चव्हाण यांनी शालेय शिक्षणात दिलेल्या माफी सवलतीमुळे आज ग्रामीण भागातील मुली शिक्षण घेऊन उच्च पदावर पोचल्या, तर धर्मांतर केल्यावरही फी सवलत कायम राहावी, अशी तरतूद यशवंतराव यांनी करून ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले. 

‘‘उद्याचा यशस्वी नागरिक’ यावर वर्धमान जैन यांनी मार्गदर्शन केले. ध्येयपूर्तीचे स्वप्न साकार करताना विद्यार्थ्यांनी थोरा-मोठ्यांच्या सहवासात राहून स्वतःवर विश्वास ठेवून निष्ठेने कृती केली तर तो चांगला नागरिक होईल.’’ 

प्रास्ताविकात संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे यांनी पन्नास वर्षांपूर्वी चाळीस विद्यार्थी घेऊन सुरू झालेल्या महाविद्यालयात आज पाच हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे सांगितले. गुणवत्तापूर्वक शिक्षण घेण्याबरोबरच जीवन घडविण्यासाठी व्याख्यानमाला उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. संस्थेच्या वतीने माजी आमदार कृष्णराव भेगडे, गोरख काळोखे, मुकुंदराव खळदे, चंद्रकांत शेटे, दीपक शहा, प्राचार्य संभाजी मलघे, डॉ. बी. बी. जैन, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संदीप भोसले, प्रा. काशिनाथ अडसूळ यांनी केले. शैलेश शहा यांनी आभार मानले.

‘जीवनात डावे-उजवे असे काही नसते’
जिल्हाधिकारी, खासदार व त्यानंतर राज्यपाल अशी विविध पदांची जबाबदारी सांभाळली. यापैकी कोणते क्षेत्र आवडते होते, या संयोजकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी विविध निवडणुकांत उमेदवारांचे अर्ज स्वीकारले. नंतर खासदार पदासाठी स्वतः अर्ज भरला. त्यानंतर राज्यपाल झाल्यावर लोकप्रतिनिधींना शपथ देण्याचेही काम केले. जीवनात डावे उजवे असे काही नसते, दोन्ही हात आपलेच असतात; मग नावडायचा सवालच नाही.

यशवंतरावांच्या आठवणीने गहिवर
यशवंतरावांच्या जन्माची कथा ते त्यांचे शालेय शिक्षण, राजकीय प्रवास, त्यांनी राबविलेली धोरणे, त्यांचा विवाह आदी प्रसंग त्यांनी उलगडून दाखविले. मात्र, त्यांच्या पत्नीचे निधन आणि यशवंतरावांचे निधन हे प्रसंग कथन करताना पाटील यांना गहिवरून आले. त्या वेळी उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या.

Web Title: Yashwantrao Chavan Education Field Shriniwas Patil