यशवंतराव होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक करू - राम शिंदे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

पुणे - मराठ्यांचा इतिहास पाहिला असता होळकर घराण्याचे कार्य खरोखरच मोठे असल्याचे आढळते. त्यांच्या कार्याला लोकांपर्यंत पोचविण्यासाठी होळकरांवर आधारित साहित्यनिर्मितीसाठी आणि यशवंतराव होळकरांचे गाव असणाऱ्या वाबगावला राष्ट्रीय स्मारक बनविण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी दिली. 

पुणे - मराठ्यांचा इतिहास पाहिला असता होळकर घराण्याचे कार्य खरोखरच मोठे असल्याचे आढळते. त्यांच्या कार्याला लोकांपर्यंत पोचविण्यासाठी होळकरांवर आधारित साहित्यनिर्मितीसाठी आणि यशवंतराव होळकरांचे गाव असणाऱ्या वाबगावला राष्ट्रीय स्मारक बनविण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी दिली. 

महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘महाराजा यशवंतराव होळकर गौरव पुरस्कार’ यंदा अभिनेते अजिंक्‍य देव यांना शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला. समाजसेवक के. एल. खाडे, प्रा. हरी नरके, संजय सोनावणी, प्रतिष्ठानचे राम खाडे हे उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, ‘‘अहिल्याबाई होळकरांनी त्या काळी नर्मदा नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यामुळे आजही अनेक गावांना पाणी मिळत आहे. त्यांच्या या कामाची प्रेरणा घेऊन राज्यात जलसंवर्धनाचे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी आगामी काळात ३४ जिल्ह्यांमध्ये त्यांच्या नावाने ‘जलमित्र पुरस्कार’ देण्यात येणार आहे.’’  

सत्काराला उत्तर देताना देव यांनी यशवंतराव होळकरांचे कार्य मोठे असल्याचे सांगत लवकरच त्यांच्यावर आधारित मालिका तयार करण्याचा मानस व्यक्त केला. तसेच सुमारे पन्नास वर्षे राज्य कारभार करणाऱ्या पहिल्या स्त्री राज्यकर्त्या अहिल्याबाई होळकर यांच्यावर आधारित ३५० भागांच्या हिंदी मालिकेचे काम सुरू असून, जून महिन्यात ही मालिका प्रदर्शित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या वेळी प्रतिष्ठानच्या वतीने शिंदे यांना यशवंतराव होळकर यांचे पुण्यात भव्य स्मारक उभारणार आदी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. संजय सोनावणीलिखित ‘भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते-यशवंतराव होळकर’ या चरित्र पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.     

नोटाबंदी देशहिताचीच - शिंदे
‘‘भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यावर अनेक वेळा देश बदलणार, देश बदलणार, असे सांगितले जात होते; परंतु लोकांनी ते तितकेसे गांभीर्याने घेतले नव्हते; मात्र आठ नोव्हेंबर रोजी ५०० व १००० रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला आणि संपूर्ण देशातील चित्रच पालटले. देश खरोखरच बदलू लागला आहे. या बदलामुळे थोडा त्रास होत असला, तरी नोटाबंदीचा निर्णय देशहिताचाच आहे.’’

Web Title: yashwantrao holkar national monument