डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांची खाबूगिरी

YCM-Hospital
YCM-Hospital

पिंपरी - वायसीएममध्ये डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांची खाबूगिरी सुरू आहे. रुग्णांना औषधे ठराविक मेडिकलमधून घेण्यास सांगणे, खासगी दवाखान्यात जाण्यास सांगणे, अतिदक्षता विभागात जागा शिल्लक नसल्याचे कारण देत खासगी रुग्णालयात पाठविणे, तसेच रुग्णवाहिका चालकांच्या मदतीने रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवून कमिशन उकळणे, असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे गरीब रुग्णांची लूट होत असून प्रशासनाने मात्र डोळ्यांवर पट्टी बांधली आहे.

सरकारी रुग्णालय असल्याने उपचार परवडतील म्हणून शहर, उपनगरासह जिल्ह्याच्या विविध भागांतून अनेक रुग्ण वायसीएममध्ये येतात. मात्र, वायसीएमची सेवा चांगली नसल्याचे सांगून त्यांना खासगी रुग्णालयाची वाट दाखवली जाते. यातून डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांना दरमहा हजारो रुपयांचे कमिशन मिळते. 

औषध कंपन्यांशी साटेलोटे
रुग्णालयात दरवर्षी कोटींची औषध खरेदी होते. मात्र, औषध कंपन्यांचे प्रॉडक्‍ट खपविण्यासाठी त्यांचे एमआर डॉक्‍टरांच्या भेटीला येतात. कमिशन, परदेश सहल व इतर प्रलोभन दाखवून त्यांची औषधे रुग्णांना लिहून देण्यास सांगतात. डॉक्‍टरही रुग्णालयात औषध उपलब्ध असताना विशिष्ट कंपनीच्या ब्रॅंडचे औषध लिहून देतात. ते औषध रुग्णालयासमोर असलेल्या मेडिकलमध्ये हमखास मिळते. एखाद्याने जेनेरिक किंवा रुग्णालयात मिळणाऱ्या औषधांचा आग्रह धरल्यास ती परिणामकारक नसल्याचे सांगून ठराविक ब्रॅंडच घेण्यास सांगितले जाते. यात प्रशिक्षणार्थीही डॉक्‍टरही मागे नाहीत.      

सीएमओंची खाबूगिरी
तातडीक उपचारासाठी वायसीएममध्ये आलेल्या रुग्णास बेड उपलब्ध नसल्याचे सांगून त्वरित ससून रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला सीएमओ नातेवाइकांना देतात. तेथेही खात्रीशीर उपचार मिळणार नसल्याचे सांगून रुग्णांना थेट कमिशन मिळणाऱ्या खासगी रुग्णालयात पाठवले जाते. दरम्यान, एका सीएमओचे लाखोंचे कमिशन थकल्याने एका खासगी डॉक्‍टरशी त्यांचा रुग्णालयातच वाद झाल्याचे कळते आहे. 

साहित्यासाठी दलाल
विविध शस्त्रक्रियांसाठी खासगी रुग्णालयात येणारा खर्चाची माहिती डॉक्‍टरच रुग्णांना सांगतात. रुग्ण तयार असल्यास एका दलालाचा मोबाईल क्रमांक देऊन पुढील प्रक्रिया समजावली जाते. खर्च करण्याची ऐपत नसल्याने वायसीएममध्येच शस्त्रक्रिया करायची ठरल्यास, त्यासाठी लागणारे साहित्य ते सांगतील त्या व्यक्तीकडून घेण्यास सांगितले जाते, असे अनुभव हाडांच्या उपचारासाठी आलेल्या रुग्णांना जास्त येतात. 
 
डॉक्‍टरांकडे व्हिजिटिंग कार्ड 
वायसीएम रुग्णालयात आलेल्या गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात चांगले उपचार होतील, असे सांगत अनेक डॉक्‍टरांच्या ओपीडीच्या टेबलमध्ये खासगी रुग्णालयांच्या व्हिजिटिंग कार्डचे ठेवलेले असतात. रुग्णालयात हे प्रकार उघडपणे सुरू असताना वैद्यकीय अधीक्षक व उपअधीक्षकांना याबाबत थांगपत्ता नसतो.

ससून रुग्णालय किंवा वायसीएममधील रुबी हेल्थ केअर व्यतिरिक्त खासगी रुग्णालयात रुग्णाला पाठवण्यास प्रतिबंध घातला आहे. रुग्णालयातून बाहेर पाठवलेल्या रुग्णांची नोंद ठेवण्यासाठी तयार केलेले स्वतंत्र रजिस्टरमधून रुग्णांची पडताळणी केली जाते. 
- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, पदव्युत्तर संस्था, वायसीएम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com