"पुलोत्सव' यंदा ग्लोबल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

पुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. चित्रपट, नाटक, संगीत, साहित्यविश्‍वात मुशाफिरी करणाऱ्या व्यक्तीच्या वैविध्यपूर्ण आविष्कारांचा उत्सव अर्थात "पुलोत्सव' यंदा ग्लोबल होत आहे. पुण्यासह देशातील 20 शहरे आणि भारताबाहेर पाच खंडांमधील 30 शहरांत हा उत्सव येत्या आठ नोव्हेंबरपासून साजरा केला जाणार आहे. 

पुणे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. चित्रपट, नाटक, संगीत, साहित्यविश्‍वात मुशाफिरी करणाऱ्या व्यक्तीच्या वैविध्यपूर्ण आविष्कारांचा उत्सव अर्थात "पुलोत्सव' यंदा ग्लोबल होत आहे. पुण्यासह देशातील 20 शहरे आणि भारताबाहेर पाच खंडांमधील 30 शहरांत हा उत्सव येत्या आठ नोव्हेंबरपासून साजरा केला जाणार आहे. 

पु. ल. देशपांडे यांचे आठ नोव्हेंबर 2018 ते आठ नोव्हेंबर 2019 हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने हा उत्सव वर्षभर चालणार आहे. पु. ल. परिवार, आशय सांस्कृतिक यांनी उत्सवाचे आयोजन केले आहे; तसेच पुण्यभूषण प्रतिष्ठान, महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, नाट्य परिषद (पुणे) या संस्थांचा देखील संयोजनामध्ये सहभाग आहे. अमेरिका, कॅनडा, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांसह युरोपमधील काही शहरांमध्ये हा उत्सव होत आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या वेळी "पुण्यभूषण'चे डॉ. सतीश देसाई, "आशय'चे सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव, बांधकाम व्यावसायिक गजेंद्र पवार, कृष्णकुमार गोयल, मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, मेघराज राजेभोसले, नयनीश देशपांडे, मयूर वैद्य या वेळी उपस्थित होते. 

साहित्य परिषदही ऐंशी शाखांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करणार आहे. 

जोशी म्हणाले, ""पुलंच्या साहित्यातील वेगळेपणाची ओळख करून देणारा साहित्य पत्रिकेचा अंक परिषदेमार्फत प्रकाशित करण्यात येणार आहे.'' नाट्य परिषद आणि चित्रपट महामंडळामार्फतही पुलंच्या साहित्यावर दर महिन्याला एका कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे राजेभोसले यांनी सांगितले. 

डॉ. सतीश देसाई म्हणाले, ""मराठी साहित्यिकाच्या नावाने जगभरात प्रथमच असा उत्सव होत आहे. ग्लोबल पुलोत्सवच्या निमित्ताने विविध देशांमधील महाराष्ट्र मंडळे एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. या उत्सवाच्या काळात कार्यक्रमांचे आयोजन हीच मंडळे करतील. त्यांना हवी असलेले कलाकार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.'' 

पुलोत्सवात विविध ठिकाणी वर्षभर कार्यक्रम होणार आहेत. आठ नोव्हेंबरपासून त्याची सुरवात होईल. पुलंचे साहित्य शाळा, महाविद्यालयांपर्यंत म्हणजे पुढील पिढीपर्यंत पोचविण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक शहरातील पंधरा महाविद्यालयांमध्ये त्यांच्या साहित्याबद्दल सर्वेक्षण करण्यात येईल. 
वीरेंद्र चित्राव, आशय फिल्म क्‍लब 

Web Title: this year pulostav Global