कोरोनाकाळात गरजूंना मदत करणाऱ्या 'युवा वॉरियर्स' चा सन्मान; YIN ने युवकांची यशोगाथा आणली पुढे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 February 2021

ज्यांची समाजाने दखल घ्यावी, अशा आदर्शांचा हा सन्मान आहे, त्यांच्या पाठीवर ही थाप असून त्यांचे कार्य सकाळ समाजासमोर आणत आहे.

पुणे : कोरोना काळात गरजूंना मदत, गरीब विद्यार्थ्यांना विद्यादान आणि अभावाच्या स्थितीतही वेगळी वाट धरून आपल्या कार्याचा ठसा अमीट ठसा उमटविणाऱ्या राज्यातील 35 शिलेदारांच्या शिरपेचात 'युवा वॉरिअर्स' हा मानाचा तुरा दिमाखात खोवला गेला आणि त्यांची कर्तृत्वगाथा समाजासमोर आली.

'सकाळ यंग इन्सिरेटर्स नेटवर्क'ने राज्यभरातील सामाजिक, राजकीय, सहकार, संस्कृतिक वैद्यकीय, कृषी व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या या शिलेदारांचा 'युवा वॉरियर्स' पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच समाजातील युवा पिढीसमोर आदर्श निर्माण करण्यासाठी राज्यातील विविध भागातील युवकांची यशोगाथा पुस्तक रुपाने तयार करण्यात आली. यावेळी सहकार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, उद्योग क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे, सकाळ माध्यम समूहाचे संचालक-संपादक श्रीराम पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, संपादक संदीप काळे, संकल्प ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे संचालक डॉ.पी.एन.कदम, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अभिनेता प्रवीण तरडे उपस्थित होते.

पुण्यात उद्यापासून पुन्हा निर्बंध; संचारबंदीची वेळ जाहीर, शाळा-महाविद्यालयांबाबत मोठा निर्णय​

विशेषांकाचे प्रकाशन
पुरस्कारप्राप्त शिलेदारांच्या माध्यमातून राज्याच्या विकासाचे वेगळे मॉडेल तयार व्हावे म्हणून या शिलेदारांची शौर्यगाथा आणि कार्यगाथा युवा वॉरियर्स अंक स्वरूपात तयार करण्यात आली. या विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

श्रीराम पवार प्रास्ताविक करताना म्हणाले, "ज्यांची समाजाने दखल घ्यावी, अशा आदर्शांचा हा सन्मान आहे, त्यांच्या पाठीवर ही थाप असून त्यांचे कार्य सकाळ समाजासमोर आणत आहे. तंत्रज्ञानाबरोबर जगही बदलत आहे. अशा स्थिती युवकांना योग्य दिशा द्यावी लागेल. हेच काम राज्यभरातील युवकांची मोट बांधून यंग इन्सिपेरटर्स नेटवर्क करीत आहे."

पुरस्कार विजेते
संध्या सचिन गाडेकर,अमोल दरेकर, डॉ.रवींद्र सपकाळ, राम शिंदे, डॉ. राज नगरकर,अनिकेत बनसोडे, प्रतीक दगडे, मयूर भांडे, शिवम बालवाडकर, सुजित थिटे, संमित शहा, ऋतुराज पाटील, दादू सलगर, रवींद्रनाथ माळी, प्रदीप गोरडे, अमर पाटील, सुवर्णा जोशी, मामीत चौगुले, निशांत भगत, गणेश म्हात्रे, शिरीष घरत, देवेंद्र कांबळे, रवी बोडके, रोहित सरक, शिवराज मोटेगावकर, प्रणिता चिखलीकर, डॉ एस.के.बिरादार, अंकुश सोनावणे, आशुतोष सांगोले, ज्ञानेश्वर बोगीर, गिरीश शर्मा, यासिफ यत्नाळ, सारंग तारे, ऋत्विज चव्हाण, अजिंक्य जोशी.

झेडपीची 'मुद्रांक शुल्क'ची थकबाकी टप्याटप्याने देऊ; अजित पवार यांचे आश्‍वासन

देशात तरुण वयात क्रांती केलेली अनेक उदाहरणे देता‌ येतील. यातूनच समाज परिवर्तन घडत गेले. समाजाचे आपण काही‌ देणे लागतो, अशी भावना ठेऊन या शिलेदारांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. मला वाटते, प्रत्येक‌ जण ज्या क्षेत्रात काम करतो, तिथे‌ त्याने सर्वोत्कृष्ट काम केली, तरी ते समाजासाठी मोठे योगदान ठरेल.
- डॉ. विश्वजित कदम (राज्यमंत्री)

युवकांमधील शक्तीला योग्य दिशा देण्याचे काम 'यिन' करीत आहे. कोणतेही भक्कम पाठबळ असो किंवा नसो, कठीण परिस्थितीत स्वतःच्या कर्तृत्वावर समाजात मानाचे स्थान मिळविता येते, याचा वस्तुपाठ या तरुणांनी दिला आहे. त्यांचा‌ सन्मान हा त्यांच्या पुढील कार्यासाठी नक्कीच बळ देईल.
- आदिती तटकरे (राज्यमंत्री)

जग बदलत असताना करिअरसाठी कोणते क्षेत्र निवडावे, हा संभ्रम आहे. त्यातून स्वत:ची वेगळी वाट निवडून काहीजण युवा वॉरिअर बनतातही. पण पुढील काळात अन्न-वस्र-निवारा, शिक्षण आणि वाहतूक ही क्षेत्रे निवडा तुम्हाला सेवेचा आनंद आणि करिअर केल्याचे समाधानही मिळेल.
- डॉ. पी. एन. कदम (उद्योजक)

रविवार ठरला घातवार; एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू

देशातील बलाढ्य तरुण पिढी देशाला बलाढ्य बनवत असते. 'यिन'च्या माध्यमातून अशा तरुण पिढीचे कार्य आणि यशोगाथ समाजासमोर आली आहे, हे इतरांसाठी प्रेरणादायी आहे.
- प्रवीण तरडे (अभिनेता)

तरुणांचे चांगले कार्य‌ हे समाजाला समजलेच पाहिजे. त्यांच्या‌ सन्मान केल्याने त्यांना उर्जा तर मिळेलच. याशिवाय ते समाजातील तरुणांना दिशाचे देण्याचे काम करीत राहतील.
- महेंद्र कल्याणकर (कामगार आयुक्त)

दुसऱ्यांची‌ सेवा करण्यासारखे दुसरे पुण्यकर्म नाही. इतरांचे दु:ख ओळखून ते दूर करण्यासाठी  झटणारे हे युवक गांधीजींचे खरे वैष्णव जन आहेत. त्यांनी इतरांची पीडा दूर केली आहे.
- कृष्ण प्रकाश (पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: YIN have honored 35 people who helped needy during Corona period