बारामतीत घुमला भ्रामरीचा ‘ओम’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

बारामती - येथील छत्रपती शाहू हायस्कूलमध्ये ‘योगा वुईथ सकाळ’ उपक्रमात अक्षरांमध्ये बसून हजारो विद्यार्थ्यांच्या तोंडून भ्रामरीचा ‘ओम’ एकत्र घुमला आणि तासाभराच्या आसनांनंतर ‘लय भारी वाटलं’ अशी सहज प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून व्यक्त झाली.

बारामती - येथील छत्रपती शाहू हायस्कूलमध्ये ‘योगा वुईथ सकाळ’ उपक्रमात अक्षरांमध्ये बसून हजारो विद्यार्थ्यांच्या तोंडून भ्रामरीचा ‘ओम’ एकत्र घुमला आणि तासाभराच्या आसनांनंतर ‘लय भारी वाटलं’ अशी सहज प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून व्यक्त झाली.

‘सकाळ माध्यम समूहा’ने बारामतीत सलग तीन दिवस आयोजित केलेल्या ‘योगा वुईथ सकाळ’ या उपक्रमात आज (ता. २०) दुसऱ्या दिवशी पाटस रस्त्यावरील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शाहू हायस्कूल सहभागी झाले होते. हायस्कूलमधील पाचवी ते बारावीतील दोन हजार विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला. दररोज साडेअकरा वाजता भरणाऱ्या या हायस्कूलमध्ये या उपक्रमासाठी आजचा दिवस सकाळी आठ वाजता सुरू झाला. त्यासाठी शाळेने अगोदरच सूचना दिली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी योगासन करण्यासाठी घरून साहित्य आणले होते. 

येथील जीवनविद्या योग आयुर्वेद फाउंडेशनचे प्रमुख डॉ. नीलेश महाजन यांनी व त्यांचे सहशिक्षक अण्णा ढमे यांनी विद्यार्थ्यांना आसने शिकवली. योगाचे महत्त्व विशद केले. मनाच्या एकाग्रतेसाठी योग महत्त्वाचा आहे, हे समजावून सांगताना त्यांनी दोन मिनिटांची विद्यार्थ्यांची चाचणीही घेतली. या उपक्रमासाठी शाळेने खास योगाची प्रतिकृती व योगा वुईथ सकाळ या अक्षरानुसार विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केली होती. 

शाळेचे प्राचार्य वसंत माने, उपप्राचार्या आशा कुलकर्णी, पर्यवेक्षक संजय ढवाण, शिक्षक प्रतिनिधी गणपत तावरे, काशिनाथ सोलनकर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर प्रतिनिधी व ‘सकाळ‘चे जाहिरात विभागाचे सहायक व्यवस्थापक घनश्‍याम केळकर, संजय घोरपडे या वेळी उपस्थित होते. 

संजय ढवाण यांनी सूत्रसंचालन केले. ‘सकाळ’चे वितरण विभागाचे सहायक व्यवस्थापक मनोज काकडे यांनी आभार मानले.

Web Title: yoga with sakal