esakal | आजचा राष्ट्रवाद युरोपीयन; केवळ हिंसा देणारा : योगेंद्र यादव
sakal

बोलून बातमी शोधा

yogendra yadav

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य समर्पित केलेले डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित 'कोरोनापश्चात स्वराज्याचा‌ अर्थ' या विषयावर योगेंद्र यादव यांचे ऑनलाइन व्याख्यान झाले.

आजचा राष्ट्रवाद युरोपीयन; केवळ हिंसा देणारा : योगेंद्र यादव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. 20 : "लोकशाही, राष्ट्रवाद, भांडवलवाद, आधुनिक विज्ञान आणि संस्थात्मक धर्म या मानवनिर्मित व्यवस्था मानवाच्या मार्गातील अडथळा बनल्या आहेत. त्यात मूलभूत सुधारणा केली, तरच मानवकेंद्री स्वराज्य निर्माण होऊ शकेल. त्यासाठी विवेकवादाला 21 व्या शतकात आणावे लागेल," असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि स्वराज अभियानचे संस्थापक सदस्य योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले.

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य समर्पित केलेले डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित 'कोरोनापश्चात स्वराज्याचा‌ अर्थ' या विषयावर योगेंद्र यादव यांचे ऑनलाइन व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी 'सकाळ'चे अध्यक्ष आणि अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष श्री. प्रतापराव पवार होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुक्ता‌ दाभोलकर, हमीद‌ दाभोलकर, श्रीपाल ललवाणी आदी यात सहभागी झाले होते.

कोरोनासारखे संकट नवे नाही. परंतु आधुनिक सभ्यतेने सर्वांना खुश ठेवण्याचे दाखविलेले स्वप्न या संकटाने निरर्थक ठरविले आहे, असे सांगताना यादव म्हणाले की, "संकटांच्या‌ मुळाशी मानवनिर्मित पाच व्यवस्था आहेत. स्वशासन, स्नेह, समृद्धी, सत्य आणि सुख यासाठी या व्यवस्थांची निर्मिती झाली. ती आता मानवावर स्वार झाली आहे. लोकशाहीने काही लोकांना ताकद दिली. पण अनेकांचे कल्याण त्याने झाले नाही. आता पक्ष, पैसा आणि माध्यमांचे या व्यवस्थेवर नियंत्रण आहे."

हे वाचा - Video: डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी सापडले, सूत्रधार कधी?

"राष्ट्रवाद‌ाच्या मुळाशी एकोपा आणि प्रेम या संकल्पना होत्या. मात्र आता देशात पेरला जाणारा राष्ट्रवाद हा युरोपातून आलेला आहे. त्याने आपल्याला केवळ हिंसा दिली आहे, लोकांना एकमेकांपासून तोडण्याचे काम केले आहे. भांडवलवादानेही सर्वांकडे सर्वकाही म्हणजे अभावातून मुक्ती असे स्वप्न दाखविले. पण आता या कल्पनेने एकीकडे समृद्धी आणि दुसरीकडे दुःख अशी स्थिती निर्माण झाली आहे," असे त्यांनी सांगितले.

"आधुनिक विज्ञानाने समाजाला अंधश्रद्धा, अज्ञानापासून मुक्ती दिली; पण विज्ञान ही व्यवस्था झाली आणि विज्ञानाचा वापर ज्ञान दडवून ठेवण्यासाठी होऊ लागला. धर्म ही मूळ चांगली कल्पना. पण पुढे आश्रम, चर्च, मशिदींचा संस्थात्मक धर्म निर्माण झाला. त्यामुळे माणूस माणसापासून आणि स्वत:पासूनही दूर झाला. त्यापासून मुक्तीसाठी स्वराज्य 2.0 हा विचार करावा लागेल. या बदलासाठी राजकारण हेच माध्यम आहे. राजकारण म्हणजे केवळ सत्ता नव्हे; तर सत्तायोग, क्रांतीयोग, ज्ञानयोग, सहयोग आणि ध्यानयोग या पंचांग कर्मयोगाने मानवकेंद्री स्वराज्य निर्माण होईल, असा आशावाद यादव यांनी व्यक्त केला.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रतापराव पवार म्हणाले, की डॉ. दाभोलकरांनी संपूर्ण जीवन समाजासाठी समर्पित केले, बलिदान दिले. केवळ समाजाचे भले व्हावी, हीच त्यांची‌ कामना होती. यात कुणाचा द्वेष, मत्सर नव्हता. म्हणूनच आज हजारो अनुयायी स्वच्छेने, स्वखुशीने आणि स्वखर्चाने डॉ. दाभोलकरांचे काम पुढे नेत आहेत. यातूनच अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार पुढे‌ जात राहील. पुढील काळातही त्याची गरज राहणार आहे."

loading image
go to top