नागपूर - पार्कच्या ठिकाणी झालेले उत्खनन.
नागपूर - पार्कच्या ठिकाणी झालेले उत्खनन.

तुम्ही अनुभवा आदिमानवाचा काळ

पुणे - गौतम बुद्धांच्याही आधी एक हजार वर्षांपूर्वी मानव कसा होता, हे पाहायला तुम्हाला आवडेल ना? त्याची जीवनशैली कशी होती, तो कसा राहायचा, काय खायचा, त्याची शिकार करण्याची हत्यारे कोणती होती, याची उत्सुकताही तुम्हाला आहे ना? तर मग चला मार्चमध्ये नागपूरला. कारण, तिथे साकारतोय देशातील पहिला ‘आर्किऑलॉजिकल थीम पार्क’! पुरातत्त्व आणि भाषाशास्त्रात संशोधन करणाऱ्या पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या मदतीने हा प्राचीन इतिहास शास्त्रीय पद्धतीने आधुनिक मानवासमोर उलगडला जाणार आहे. 

अश्‍मयुगातील हत्यारे विद्यार्थ्यांना फक्त पाठ्यपुस्तकातून चित्र स्वरूपात पाहता येतात; पण या माध्यमातून अश्‍मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग या प्रत्येक युगात मानवाचा विकास कसा झाला, त्याची शिकारीची हत्यारे कशी बदलली. त्या अनुषंगाने त्याच्या जीवनशैलीमध्ये कसा बदल झाला, याची शास्त्रीय माहिती तुम्हाला आता ‘आर्किऑलॉजिकल थीम पार्क’मधून मिळणार आहे. 

या पार्कबद्दल ‘सकाळ’शी बोलताना डेक्कन कॉलेजचे कुलगुरू प्रा. वसंत शिंदे म्हणाले, ‘‘नागपूरजवळ गोरेवाडा या आरक्षित जंगलातील बारा एकरांत ‘आर्किऑलॉजिकल थीम पार्क’ साकारले जात आहे. दोन टप्प्यांमध्ये विभागलेल्या पार्कमधील पहिल्या टप्प्याचे काम आता पूर्ण होत आले आहे.

तीन हजार वर्षांपूर्वी दफन केलेल्या मानवाचे अवशेष गोरेवाडा येथे सापडले आहेत. त्याचे उत्खनन करण्यात येत आहे. या उत्खननातून सापडलेले अवशेष त्याच्या सुरक्षिततेसाठी त्यावर काचेचे आवरण लावून ते जतन करणार आहे. त्या माध्यमातून तेथे पर्यटनाला चालना देण्यात येईल. तेथे तीन ठिकाणी उत्खननाचे काम पूर्ण झाले आहे. मार्चअखेरपर्यंत उर्वरित काम पूर्ण होईल.’’

या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात, पाषाण युगापासून ते लोहयुगापर्यंत मानव कसा राहात होता, हे तुम्हाला तेथे विविध प्रारूपांच्या माध्यमातून पाहता येईल. वेगवेगळ्या युगातील मानवी जीवन यातून लोकांना सहजतेने कळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

या प्रकल्पाची सुरवात करणारे राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी म्हणाले, ‘‘तीन हजार वर्षांपूर्वीच्या दफनभूमीत मोठे दगड गोलाकार लावले होते. त्यांच्या उत्खननातून आतापर्यंत तेथे मानवाचे सहा सांगाडे मिळाले आहेत. त्याच्यासोबत तांब्याच्या बांगड्या अशी आभूषणे मिळाली आहेत. गौतम बुद्धाच्या आधी एक हजार वर्षांपूर्वीचा हा इतिहास आहे. दफन करताना त्या व्यक्‍तीला आवडणाऱ्या वस्तूदेखील त्याच्या सोबत ठेवल्या आहेत, ही माहिती समोर आल्यामुळे येथे उत्खनन करून या ‘थीम पार्क’च्या उभारणीत डेक्कन कॉलेजची मदत घेण्यात येत आहे.’’

आजच्या तरुणांना आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल माहिती पुरविणे आवश्‍यक आहे. देशातील हा अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे. याच्या यशस्वीतेनंतर देशाच्या इतर भागातही असे प्रकल्प उभारता येतील, असा विश्‍वास वाटतो.
- प्रा. वसंत शिंदे, कुलगुरू, डेक्कन कॉलेज, पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com