सांगली महापुरावरून राजकीय टीका केल्याने पुण्यात तरुणाला मारहाण

fighting.jpg
fighting.jpg

पुणे : सांगलीत आलेल्या महापुरात मदत करण्यावरून राजकीय टीका केल्याचा राग आल्याने पलूस येथून पुण्यात आलेल्या पाच जणांनी तरुणाचे कारमधून अपहरण करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

गुरुप्रसाद दिलीप लाड, जगदीश निवास लाड, सुरज संजय लाड, संदीप लाड, आशुतोष जयवंत लाड (सर्व रा. कुंडल, ता. पलूस, सांगली) यांच्यावर मारहाण, अपहरण याचा गुन्हा दाखल केला आहे. आदित्य उर्फ अतुल उत्तम लाड (वय २२, रा. कोथरूड) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. 

फिर्यादी आदित्य आणि आरोपी हे एकाच गावचे असून, ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पलूस भागात महापुर आल्यानंतर तेथील स्थानिक आमदार डाॅ. विश्वजीत कदम हे नागरिकांच्या मदतीला धावून गेले होते. त्यावरून आदित्य लाड यांनी त्यांच्या गावाकडील 'लाड सरकार' आणि 'एल ग्रुप' यासह इतर वाॅट्सअॅप ग्रुपवर "पुरातील जनतेला आमदार साहेब मदत करतात, बाकीचे लाडोबा कुठे गेले?, स्वतःचे लाड करायला वगैरे' अशी पोस्ट टाकली. 

याचा राग मनात धरून आरोपींनी आदित्य लाड यांना फोन करून धमकावले होते. मंगळवारी हे पाचही आरोपी पांढऱ्या रंगाच्या कारमधून कोथरूड येथील आदित्य यांच्या घरी आले. त्यांना कारमध्ये जबरदस्तीने बसवून साधारण दीड किलोमीटर लांब पौडफाटा येथून केळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोरे श्रमिक वसाहत येथे नेले. "तु बदनामी करणारा मेसेज का टाकला आहे? " असे म्हणत लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. टायरच्या रबरी ट्यूबने पाठीवर, तोंडावर फटके मारले. त्यानंतर पुन्हा घराजवळच्या चौकात आणून सोडले. "तु गावाकडे येऊन आमच्या पाया पडून माफी मागायची नाहीतर तुला मारून टाकू" अशी धमकी देऊन निघून गेले. आदित्य लाड यांनी यासंदर्भात कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

फिर्यादी हे पुण्यात नोकरी करतात. त्यांनी वाॅट्सअॅप ग्रुपवर केलेल्या मेसेज मुळे मारहाण करण्यात आली. आरोपींना अटक करण्यासाठी पथक रवाना झाले आहे, असे पोलिस निरीक्षक (गुन्हे) एस. एस. खटके यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com