बारामतीचा युवा संगीतकार पाेहचला सातासमुद्रापार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

संगीताच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बारामतीच्या युवा संगीतकार अजित काकडे यांनी आपल्या संगीताने सातासमुद्रापार असलेल्या संगीत प्रेमींची मने जिंकली.

बारामती शहर : संगीताच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बारामतीच्या युवा संगीतकार अजित काकडे यांनी आपल्या संगीताने सातासमुद्रापार असलेल्या संगीत प्रेमींची मने जिंकली.

येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून संगीतावर अपार प्रेम करणारा हा युवक गुणवत्तेच्या जोरावर व अखंड मेहनतीने आपला संगीतमय प्रवास सातासमुद्रापार घेऊन गेला आणि स्वतः सोबत बारामतीचे नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. संगीताला भाषेची अडचण नसते ही बाबही या कार्यक्रमातून यानिमित्ताने समोर आली.

कझाकस्तान मधील अलमटी, शिमकेंट, अस्तना या शहरांमध्ये पंधराहून अधिक कव्वाली व सोलो सिंथेसायझर वादनाचे कार्यक्रम त्यांनी सादर केले.

म्युझिक ऑफ स्पिरीट या ग्रुपच्या माध्यमातून या संगीत महोत्सवाचे कझाकस्तान मध्ये आयोजन करण्यात आले होते. संगीताच्या माध्यमातून भारतीय संस्कृती व अध्यात्माचा प्रसार प्रचार व्हावा या डॉ. निर्मला श्रीवास्तव यांच्या स्वप्नाला मूर्त स्वरूप देण्याचे काम म्युझिक ऑफ स्पिरीटचा टीमने केले.

दत्तात्रय खैरे, प्रदीप सोळस्‍कर व कझाकस्तान मधील रहिवाशांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. श्याम जैन यांनी आपल्या आवाजाने तेथील लोकांची मने जिंकून घेतली. विशेष म्हणजे या कार्यक्रमांना पाकिस्तानी प्रेक्षकही उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान अजित काकडे यांनी कमाजय हे प्रसिद्ध संगीत वाजवून रसिकांची मने जिंकली. या शिवाय पियानो तसेच सिंथेसायझर वर पंजाबी ढोल वाजवून तेथील प्रेक्षकांना ताल धरायला लावला. कझाकस्तान मधील ओटरार वृत्तवाहिनीवर वर अजित काकडे यांची मुलाखत देखील झाली. 

भारतीय कलाकारांचा स्थानिक लोकांवर पडलेला प्रभाव पाहून कझाकस्तान मधील भारतीय दूतावासातील इंडियन कल्चर सेंटरने या समूहाला कार्यक्रम सादर करण्यासाठी आमंत्रित केले होते . या दूतावासाचे संचालक संजय गर्ग यांनीही श्याम जैन व अजित काकडे यांचे कौतुक केले. त्यांच्या गुरु डॉ. निर्मला श्रीवास्तव यांच्या प्रेरणेतून हे यश साध्य केल्याचे काकडे यांनी नमूद केले विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त सुनेत्रा पवार यांनी अजित काकडे यांचे अभिनंदन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young musician succeed in baramati