तरुणाचा मृत्यू; पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

पिंपरी - भोसरी येथील पथदिव्याच्या खांबात वीजप्रवाह उतरून त्याचा धक्का बसल्याने गेल्या महिन्यात पुण्यातील तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागातील अधिकाऱ्यांविरुद्ध भोसरी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

पिंपरी - भोसरी येथील पथदिव्याच्या खांबात वीजप्रवाह उतरून त्याचा धक्का बसल्याने गेल्या महिन्यात पुण्यातील तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागातील अधिकाऱ्यांविरुद्ध भोसरी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

चेतन प्रकाश जाधव (वय २९, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) असे मृताचे नावे आहे. त्यांची पत्नी किरण (वय २१) यांनी फिर्याद दिली आहे. चेतन व किरण जाधव हे दांपत्य दोन ऑक्‍टोबर रोजी दुचाकीने भीमाशंकर येथे दर्शनासाठी गेले होते. तेथून परत येताना रात्री आठच्या सुमारास भोसरीतील जिजामाता उड्डाण पुलाजवळ दुचाकी पंक्‍चर झाली. ती रस्त्याच्या कडेला उभी करून पंक्‍चर काढण्याचे दुकाने शोधण्यासाठी चेतन हे नाशिककडे जाणाऱ्या मार्गाकडे दुभाजक ओलांडून जाऊ लागले. त्यावरील बॅरिकेड ओलांडताना पथदिव्याच्या खांबाला त्यांचा हात लागला. ते त्याच स्थितीत उभे राहिल्याचे पाहून किरण त्यांच्याजवळ गेल्या. चेतन यांना स्पर्श करून त्यांनी आवाज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, विजेचा धक्का बसल्याने त्यांचा हात फेकला गेला. किरण यांचा आवाज ऐकून काही नागरिक त्यांच्याजवळ आले. त्यांनी लाकडी दांडक्‍याने चेतन यांना बाजूला केले व भोसरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी वायसीएम रुग्णालयात नेण्यास सांगितले.

वायसीएममध्ये तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. या घटनेचा किरण यांना मानसिक धक्का बसला होता. त्यातून सावरल्यानंतर शनिवारी (ता. १७) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार महापालिकेच्या विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Youth Death Municipal Officer Crime