...अन् लग्नाचे स्वप्न राहिले अधुरेच; वीज पडून तरुण ठार

दत्ता म्हसकर
मंगळवार, 16 एप्रिल 2019

पिंपळवंडी येथील भोरवाडी येथे एका तरूणाचा वीज पडुन मृत्यु झाला. ही घटना मंगळवारी (ता. 16) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. 

जुन्नर : पिंपळवंडी येथील भोरवाडी येथे एका तरूणाचा वीज पडुन मृत्यु झाला. ही घटना मंगळवारी (ता. 16) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. 
महेश भोर (वय 28) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. महेश आज लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी जाणार होता. परंतु, त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

रात्री घरात गरम होत असल्यामुळे महेश शेतातील गोठ्यामध्ये झोपण्यासाठी गेला होता. पावसाचे वातावरण झाल्यामुळे त्याला तिथे रहाणे असुरक्षित वाटल्याने चुलते मल्हारी भोर यांच्या घराकडे जाण्यासाठी मोबाईलवरील बॅटरीच्या प्रकाशात निघाला होता. त्याचवेळी विजेचा कडकडाट होऊन काही क्षणाच्या आतच वीज त्याच्या अंगावर कोसळली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. महेशचा स्वभाव मनमिळाऊ होता त्यामुळे त्याचा मित्र परीवारही मोठा होता सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमीच त्याचा सहभाग असायचा, काही तासांपूर्वीच भेटून गेलेल्या आपल्या मित्राचे दुर्दैवी निधन झाल्याची बातमी कळताच त्याच्या मित्रपरीवारास मोठा धक्का बसला आहे. महेशच्या पाठीमागे आई, वडील, एक भाऊ व दोन बहिनी असा परिवार आहे. 

Web Title: A Youth Died due to Lightning Collapsed