Breaking: काँक्रिट मशिनचा धक्का लागल्याने पुण्यात तरुणाचा जागीच मृत्यू; बाजीराव रोडवरील घटना

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 January 2021

मंगळवारी सायंकाळी साडे सहा वाजता पवन गीते हा तरुण बाजीराव रस्त्यावरील विश्रामबागवाडा येथून पदपथाऐवजी रस्त्याच्या कडेने पायी शनिवारवाड्याच्या दिशेने जात होता.

पुणे : भरगर्दीत पायी मोबाईलवर बोलत जाणाऱ्या तरुणाला टेम्पोच्या पाठीमागील बाजूस जोडलेल्या काँक्रिट भरण्याच्या मशिनचा धक्का लागला. त्यामध्ये तरुण मशिनच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.१२) सायंकाळी साडे सहा वाजता बाजीराव रस्त्यावरील विश्रामबागवाडा येथे घडली.

पवन संजय गीते (वय 25, रा. शंकरनगर, पठारेवस्ती, खराडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर बाबासाहेब सूर्यकांत गवळी (वय 40, रा.खराडी) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे.

ती दुबई फिरुन आली अन् बोगस पासपोर्ट देणाऱ्याचं बिंग फुटलं​

मंगळवारी सायंकाळी साडे सहा वाजता पवन गीते हा तरुण बाजीराव रस्त्यावरील विश्रामबागवाडा येथून पदपथाऐवजी रस्त्याच्या कडेने पायी शनिवारवाड्याच्या दिशेने जात होता. त्याचवेळी पाठीमागून गवळी हा त्याच्या ताब्यातील टेम्पो आणि त्याच्यासोबत जोडलेले काँक्रिटचे मशिन घेऊन शनिवारड्याच्या दिशेने जात होता. त्यावेळी पवन हा तुळशीबागेतील पवित्रीका या दुकानासमोरील बैरिकेड्सच्या पलीकडून रस्त्याने जात असतानाच टेम्पोच्या पाठीमागे जोडलेल्या काँक्रिटमशीनच्या चाकाखाली आला. डोक्यावरुन चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 

धनंजय मुंडेंविरोधात अत्याचाराची तक्रार; मुंडेंचा सविस्तर खुलासा​

या घटनेनंतर शनिपार चौकापासून पाठीमागे वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजय चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच विश्रामबाग पोलिसांनी टेम्पो चालकास ताब्यात घेतले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth died on the spot on Bajirao Road after being hit by concrete machine