निवडणुकीच्या "कार्यशाळेत' तरुणाई ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

पुणे - राजकारण, समाजकारणाचा अनुभव घेण्यासाठी निवडणूक ही खऱ्या अर्थाने "कार्यशाळा' असते. या कार्यशाळेचा अनुभव घेण्यासाठी तरुणाई सरसावली आहे. पक्षाचा प्रत्यक्ष कार्यकर्ता, इच्छुक उमेदवार, बॅक ऑफिस, प्रचाराची रणनीती ठरविणे, अशा विविध भूमिकांमधून तरुण-तरुणी निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. 

पुणे - राजकारण, समाजकारणाचा अनुभव घेण्यासाठी निवडणूक ही खऱ्या अर्थाने "कार्यशाळा' असते. या कार्यशाळेचा अनुभव घेण्यासाठी तरुणाई सरसावली आहे. पक्षाचा प्रत्यक्ष कार्यकर्ता, इच्छुक उमेदवार, बॅक ऑफिस, प्रचाराची रणनीती ठरविणे, अशा विविध भूमिकांमधून तरुण-तरुणी निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. 

महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने त्याचा अनुभव घेण्यासाठी तरुण-तरुणी पक्ष कार्यालयात विविध कारणांनी प्रवेश करत आहेत. पक्षांमध्ये तरुणांना काम करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील मुख्य कार्यालयाचे बॅक ऑफिस तरुणांनी व्यापले आहे. या कार्यालयात प्रामुख्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. 

पक्षाचे कार्यालय मंत्री उदय जोशी म्हणाले, ""स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांमध्ये बऱ्यापैकी परिपक्वता आलेली असते. प्रचार साहित्य तयार करणे, सोशल मीडिया सांभाळणे, सातत्याने अपडेट करणे, उमेदवार आणि मतदारांच्या याद्या तयार करणे अशी कामांची जबाबदारी तरुणांना दिली आहे. यात काही इच्छुक कार्यकर्ते आहेत, तर काही गरजूंची मदत घेतली आहे.'' 

कॉंग्रेसची "वॉर रूम' अद्याप सक्रिय झाली नसली, तरीही सोशल मीडियाची जबाबदारी तरुणांकडेच आहे. पक्षाचे सरचिटणीस रमेश अय्यर म्हणाले,""निवडणुकीदरम्यान पक्षाच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी राजकारणाची समज असणाऱ्या युवकांची मदत घेण्यात येते. शक्‍यतो, राजकारणाची आवड आणि समज असणाऱ्या युवकांना संधी देण्यात येते. राज्यशास्त्राचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी अनुभव हवा, म्हणून आमच्याकडे येतात. निवडणुकीदरम्यान त्यांची मदत घेतली जाईल.'' 

निवडणूक प्रक्रियेत केवळ कार्यकर्ता हा केंद्रस्थानी असावा, अशा भूमिकेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने युवा कार्यकर्त्यांवर "बॅक ऑफिस'ची जबाबदारी सोपविली आहे. शहराध्यक्षा हेमंत संभूस म्हणाले, ""आमच्याकडे 18 ते 20 युवा कार्यकर्त्यांचा गट कार्यरत आहे. कार्यकर्त्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमतेच्या आधारांवर आणि त्यांच्या आवडीनुसार त्यांना कामांचे वाटप करण्यात आले आहे.'' 

"बॅक ऑफिस'चे फायदे :- 
- निवडणूक प्रक्रिया जवळून पाहण्याची आणि समजून घेण्याची संधी 
- निर्माण होतीय रोजगाराची नवी वाट 
- पक्ष कार्यालयातील कामकाजाचा अनुभव 
- राजकीय व्यावसायिकतेचे मिळताहेत धडे 

असा मिळतोय रोजगार 
काही पक्ष कार्यालयांत "बॅक ऑफिस'ला काम करणाऱ्यांना प्रती दिवस 200 ते 300 रुपये दिले जात आहेत. 

मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी असून पक्ष कार्यालयात काम करण्याची संधी मिळाल्यामुळे निवडणूक प्रक्रिया पाहायला मिळत आहे. सोशल मीडियाबरोबरच पारंपरिक प्रचार यंत्रणेची माहिती कळत आहे. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेणे, त्यांच्याशी संवाद साधल्याने निवडणुकीत कसा फायदा होऊ शकतो, याचा अनुभव घेता येत आहे. 
- सुशांत लिमये 

निवडणुकीदरम्यान होणाऱ्या राजकीय घडामोडी जवळून अनुभवण्याची संधी मला मिळाली आहे. मी इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेतले आहे. मतदारांशी संवाद साधताना आपल्यातील कौशल्यही विकसित होण्यास मदत होत आहे. 
- अंकिता थोरात

Web Title: Youth Election workshop