बाल सलामत तो .....

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

पुणे - कपाळावर तुरा हवा.... स्टायलिश हेअर स्टाइल हवी... अशी प्रत्येक तरुणाचीच इच्छा असते; परंतु आजच्या तरुणाईचे केस कायमचेच जाताना दिसत आहेत. जीवनशैली हा घटक त्यासाठी कारणीभूत असला, तरी टक्कल लपविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्याचा ट्रेंड वाढत असून, त्यात युवकांची संख्या लक्षणीय असल्याचे आढळून आले आहे. 

पुणे - कपाळावर तुरा हवा.... स्टायलिश हेअर स्टाइल हवी... अशी प्रत्येक तरुणाचीच इच्छा असते; परंतु आजच्या तरुणाईचे केस कायमचेच जाताना दिसत आहेत. जीवनशैली हा घटक त्यासाठी कारणीभूत असला, तरी टक्कल लपविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्याचा ट्रेंड वाढत असून, त्यात युवकांची संख्या लक्षणीय असल्याचे आढळून आले आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

पुरुषांमध्ये केस गळण्याचे प्रमाण वाढत आहे. पूर्वीच्या काळात उतारवयात जाणवणारी ही समस्या आता युवकांची प्रमुख चिंता झाली आहे. लग्न ठरण्यापासून ते उच्च पदाची नोकरी मिळविण्याकरिता टक्कल कमी करण्यासाठी किंवा केशप्रत्यारोपण करण्यासाठी महागड्या क्‍लिनिकला जाण्याचे युवकांचे प्रमाण वाढू लागले आहे. केशप्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया लोकप्रिय होऊन त्या आता ‘रूटीन’ होऊ लागल्या आहेत. काहीशी महागडी ही उपचारपद्धती असली, तरी त्यासाठी २५ हजारांपासून दोन लाखांपर्यंत पैसे मोजणाराही वर्ग वाढत आहे. २५ ते ३५ वयोगटातील तरुणांमध्ये टक्कल पडण्याची समस्या वाढत आहे. 

केस गळण्याचे दोन प्रकार असतात. पहिला म्हणजे केस विरळ होतात. त्यावर औषधोपचार आणि पथ्ये सांगितली जातात. दुसऱ्या प्रकारात टक्कल पडते. त्यात केसांची मुळे मृत होतात. त्यावर औषधोपचारचा परिणाम होत नाही, तेव्हा केशप्रत्यारोपण केले जाते. यासाठी पूर्वी टाक्‍याची शस्त्रक्रिया होत असे. आता सुलभ बिनटाक्‍याची शस्त्रक्रिया होते. भूल देऊन अवघ्या पाच- सहा तासांत उपचार होतात. त्यानंतर महिनाभरात केस पूर्ववत होतात, असे या क्षेत्रातील डॉक्‍टरांनी सांगितले.

केसांचे आरोग्य राखताना काही पथ्ये सांभाळणे आवश्‍यक आहे. परंतु, फसव्या जाहिरातींना बळी न पडता तज्ज्ञ डॉक्‍टरांकडूनच उपचार करून घ्यावेत. केशप्रत्यारोपण हे आता रूटीन झाले असून, आधुनिक उपचारपद्धतीमुळे टक्‍कल असलेल्यांना दिलासा मिळाला आहे.
- डॉ. धनंजय चव्हाण

केशप्रत्यारोपण हा शेवटचा पर्याय आहे. केस गळणे आणि टक्कल, यावर विविध उपचारपद्धतीही उपलब्ध आहेत. काही विशिष्ट औषधांचा वापर केला तर आणि आहार, व्यायाम यांची पथ्ये सांभाळली, तर टकलाच्या समस्येपासून सुटका होऊ शकते. 
- डॉ. सतीश वैष्णव

सुमारे ८० हजार रुपये खर्च करून केशप्रत्यारोपण शस्त्रक्रिया नुकतीच केली. आता केस पूर्ववत होऊ लागल्यामुळे पैशांचे चीज झाले. 
- श्रेयस सुकळीकर (वय ३३)

लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना व्यक्तिमत्त्व आकर्षक ठेवण्याकडे लक्ष द्यावे लागते, त्यामुळेच टक्कल दूर करण्यासाठी सुमारे दीड लाख रुपये खर्च करून केशप्रत्यारोपण केले. 
- एक नगरसेवक (वय ३८)

केस का गळतात
घाम, धूळ, प्रदूषण, केसांची स्वच्छता न राखणे, हेल्मेटचा सततचा वापर, पुरेशी झोप न होणे, पाणी कमी पिणे, व्यायामाचा अभाव, केसांना रंग देणे, सतत केसांचे स्ट्रेटनिंग करणे, व्यसनाधीनतेमुळे केस गळतात.

आहार काय हवा 
फळे, पालेभाज्या, डाळ, सोयाबीन, चिकन, मासे, अंड्यातील पांढरा भाग आदींचा आहारात समावेश डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार असावा.

Web Title: youth hair loss is increasing