फेसुबकवरून ओळख वाढवून लुटले दागिने अन् केला खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याने फेसबुकवर झालेल्या ओळखीतून संबंधित महिलेशी जवळीक निर्माण करून, कर्ज फेडण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी खून केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. 

पुणे : मुंढवा भागातून एक महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या एका महिलेचा खून करून आरोपीने मृतदेह मुळशीतील ताम्हिणी घाटामध्ये टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले.

या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याने फेसबुकवर झालेल्या ओळखीतून संबंधित महिलेशी जवळीक निर्माण करून, कर्ज फेडण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी खून केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. 

आनंद शिवाजी निकम (वय 30, रा. वृंदावन कॉलनी, तापकीरनगर, काळेवाडी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा परिसरात राहणारी 42 वर्षीय महिला 22 जूनपासून बेपत्ता होती. अनेक दिवस शोध घेऊनही ती आढळून न आल्याने महिलेच्या मुलाने मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन, कोंढवा पोलिसांनी तपास सुरू केला होता. महिलेने कुटुंबीयांना काहीही न सांगता घर सोडल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. त्यामुळे पोलिसांनी संबंधित महिलेचे फेसबुक अकाउंट तपासले. त्यावरून पोलिसांनी तपास करण्यास सुरवात केली. फेसबुकद्वारे महिला आनंद निकम याच्या संपर्कात आल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. त्या वेळी निकम याची गणेशखिंड रस्त्यावरील भोसलेनगर परिसरात स्वतःची चहाची टपरी असल्याची खबर पोलिसांना मिळाली. 

पोलिस तेथे दाखल झाले; मात्र, तोपर्यंत तो पिंपरीतील काळेवाडी येथील त्याच्या घरी गेल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी पुन्हा त्याचे घर गाठले, मात्र पोलिस आल्याची कुणकूण लागल्याने तो तेथूनही पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी त्यास काळेवाडीतून ताब्यात घेतले. आरोपीची महिलेशी फेसबुकवर ओळख झाली. तो कर्जबाजारी असल्याने व ते पैसे फेडण्यासाठी त्याने महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर महिलेस दुचाकीवरून ताम्हिणी घाटात फिरायला नेण्याचा बहाणा केला, त्यानंतर निर्जन स्थळी नेऊन तिला धमकावून तिच्याकडील दागिने घेतले. त्यानंतर तिच्यावर चाकूने वार करून खून केल्याची कबुली आरोपीने दिली. पोलिसांनी घटना स्थळाची पाहणी केली, त्या वेळी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त सुहास बावचे, सहायक आयुक्त सुनील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संपतराव भोसले, पोलिस उपनिरीक्षक अमोल गवळी, स्वप्नील पाटील यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth killed women in Pune