तरुणाईत रुजतोय प्रीवेडिंगचा ट्रेंड

अवधूत कुलकर्णी
मंगळवार, 15 मे 2018

पिंपरी - लग्न ठरल्यानंतर छायाचित्रे व व्हिडिओ शुटिंगचा (प्री-वेडिंग शूट) करून तो लग्नात दाखविण्याचा ‘ट्रेंड’ तरुणाईमध्ये रुजत आहे. त्यासाठी लागणाऱ्या शुटिंगसाठी शहरातील ठराविक ठिकाणांना पसंती दिली जात आहे. हे शुटिंग विवाहप्रसंगी दाखविले जाते.

पिंपरी - लग्न ठरल्यानंतर छायाचित्रे व व्हिडिओ शुटिंगचा (प्री-वेडिंग शूट) करून तो लग्नात दाखविण्याचा ‘ट्रेंड’ तरुणाईमध्ये रुजत आहे. त्यासाठी लागणाऱ्या शुटिंगसाठी शहरातील ठराविक ठिकाणांना पसंती दिली जात आहे. हे शुटिंग विवाहप्रसंगी दाखविले जाते.

प्री-वेडिंग शूटसाठी शांतता असलेल्या जागांना प्राधान्य दिले जाते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांसह अन्य क्षेत्रांतील विवाह जमलेले प्री-वेडिंग शूट करताना दिसतात. छायाचित्रांचा एक अल्बम करण्यासाठी किमान सात ते आठ तास लागतात. त्यातून निवडलेली १५० छायाचित्रे संबंधितांना देण्यात येतात. तसेच व्हिडिओ अल्बमही करण्यात येतो. ग्राहकाच्या बजेटनुसार खर्चाचा आकडा ठरतो. 

लवासा, पवना धरण परिसर, लोणावळा परिसरातील नयनरम्य ठिकाणे आणि पुण्यातील शनिवारवाडा, पु. ल. देशपांडे उद्यान यांना शुटिंगसाठी प्राधान्य दिले जाते. पवना धरण परिसरात सुमारे शुटिंगसाठी दिली जाणारे अशी १०० ते १५० फार्म हाऊस आहेत. दोन दिवसांच्या शुटिंगसाठी ७० हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. सात ते आठ तासांच्या शुटिंगमध्ये दैनंदिन कामे करतानाची छायाचित्रे व रोमॅंटिक हिंदी गीताच्या धर्तीवर व्हिडिओ अल्बम केला जातो. विवाह प्रसंगी ही छायाचित्रे व व्हिडिओ शुटिंग वऱ्हाडी मंडळींना स्क्रिनवर दाखविले जाते. सुमारे १५० छायाचित्रांसह व्हिडिओ शुटिंगासाठी ३० ते ३५ हजार रुपये शुल्क आकारण्यात येते. 

व्हिडिओ शुटिंग करण्यासाठी तिघांची टिम असते. त्यापैकी एकजण दिग्दर्शक असतो. तो शुटिंगचा विषय निवडून त्यासाठीचे लेखनही करतो. उर्वरित दोघेजण प्रत्यक्ष शुटिंग करतात.

शहरातील ठिकाणे
थेरगाव बोटक्‍लब, मोशी येथील इंद्रायणी नदीचा किनार, रावेत पूल, प्राधिकरणातील गणेश तलाव परिसर, दुर्गादेवी टेकडी, शाहूनगर येथील शाहू गार्डन, संभाजीनगर येथील उद्यान.

गेल्या चार-पाच वर्षांत प्री-वेडिंगसाठी फोटोशूट, व्हिडिओ अल्बम बनविण्याचा ट्रेंड आपल्याकडे रुजत आहे. 
- अभिलाष पुजारी, व्यावसायिक छायाचित्रकार, चिंचवड

Web Title: youth prewedding trend