शेतकऱ्याच्या दक्षतेने बंधारा फुटण्यावाचून वाचला

टीम ई-सकाळ
Saturday, 17 October 2020

पहिल्या तीन बंधा-यातील संपूर्ण पाणी वाहून गेले असले तरी किमान एक बंधारा तरी काही युवा शेतकऱ्याच्या दक्षतेमुळे वाचल्याचे समाधान स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

शिक्रापूर Pune News : करंदी (ता. शिरूर) येथील धामारी रस्त्यावर असलेले तीन सलग साखळी बंधारे फुटले असताना चौथा बंधारा फुटण्यापासून वाचविण्यात शेतकऱ्यांचे धाडस आणि तात्काळ उपाययोजनांमुळे यश आले. पर्यायाने मोठा पाणीसाठी अडविण्यामुळे उन्हाळ्यातील भीषण पाणी टंचाईचा प्रश्नही काही प्रमाणात कमी झाला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दोन दिवसांपूर्वी वादळी पावसाने करंदी हद्दीतील धामारी रस्त्यावर असलेल्या सलग चार साखळी नालाबांध बंधारे एकेक करुन फुटू लागले. पहिले तीन बंधारे फुटल्याने पाणी वाहून चालल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येताच करंदीतील युवक शेतकरी प्रकाश दरेकर, शहाजी भोसले, बापू दरेकर, किरण दरेकर, शिवाजीनाना दरेकर, काळूरामआण्णा दरेकर, संतोष गायकवाड आदींनी तात्काळ जेसीबी मशिन बोलावून घेतली. मोठ्या धाडसाने चौथ्या बंधाऱ्याच्या बाजुने थेट सांडव्यातच जेसीबी उतरविला आणि सांडव्याला खोली देणे सुरू केले. पर्यायाने बंधाऱ्यातील मोठ्या प्रमाणात पाणी सांडव्याच्या दिशेने वाहू लागले आणि बंधाऱ्याच्या भिंतींवरील पाणीदाब कमी झाला. याच वेळी भिंतीवरही शेजारील मुरूम टाकून त्याचीही तात्पूरती उंची वाढवून घेतली. पर्यायाने जुन्या काळी बांधलेल्या व साधारण ०.०१ टीएमसी एवढा पाणी साठा असलेल्या या बंधाऱ्यातील पाणी केवळ सांडव्यापुरते वाहून गेले व मुळ बंधारा व त्यातील संपूर्ण पाणी यामुळे वाचले. 

आणखी वाचा - पुण्यात पाईपलाईन फुटली, भिंतपडून 9 जण जखमी

अर्थात पहिल्या तीन बंधाऱ्यातील संपूर्ण पाणी वाहून गेले असले तरी किमान एक बंधारा तरी काही युवा शेतकऱ्याच्या दक्षतेमुळे वाचल्याचे समाधान स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केले. वाचलेल्या एका बंधाऱ्यामुळे साधारण ५० एकर क्षेत्राचा एप्रिलपर्यंतचा पाणीसाठा प्रश्न दूर झाला. दरम्यान जे तीन बंधारे फुटले आहेत त्यांची ताबडतोब दुरुस्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी काळूराम आण्णा दरेकर यांनी केली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth saved bund karandi shikrapur taulak

Tags
टॉपिकस
Topic Tags: