

जगभरातील युवकांसमोर ‘रोजगारकोंडी’
बेरोजगारीचा दर १२.४ टक्क्यांवर; ‘एआय’मुळे ६.१ टक्के नोकऱ्यांवर परिणाम
जिनिव्हा, ता. १२ (वृत्तसंस्था) : जगभरात मंदावलेला आर्थिक विकास आणि रोजगारनिर्मितीची परिस्थिती कमकुवत असल्यामुळे जगभरातील तरुणांसमोरील रोजगाराच्या संधी कमी होत आहेत. जागतिक युवा बेरोजगारी वाढत असून अधिकाधिक तरुण रोजगार, शिक्षण किंवा प्रशिक्षणापासून दूर जात आहेत, असा निष्कर्ष आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या नव्या अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार, १५ ते २९ वयोगटातील तरुणांकडे असलेल्या रोजगारांपैकी ६.१ टक्के रोजगार कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) होणाऱ्या बदलांना मोठ्या प्रमाणात सामोरे जाण्याची शक्यता आहे.
‘ग्लोबल एम्प्लॉयमेंट ट्रेंड्स फॉर यूथ २०२६ : बॅक टू द फ्युचर’ या अहवालानुसार, २०२५मध्ये जगातील युवा बेरोजगारीचा दर १२.४ टक्क्यांवर पोहोचला. त्यानुसार १५ ते २४ वयोगटातील सुमारे ६.७ कोटी तरुण बेरोजगार होते. त्याचवेळी रोजगार, शिक्षण किंवा प्रशिक्षण यापैकी कोणत्याही क्षेत्रात नसलेल्या (नीट) तरुणांचे प्रमाण किंचित वाढून २० टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे अशा तरुणांची संख्या २५.७ कोटींपेक्षा अधिक झाली आहे. उच्चउत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये युवा बेरोजगारीत झालेली वाढ विशेष चिंताजनक आहे.
श्रीमंत देशांमध्येही संधी घटल्या
- २०२३ ते २०२५ या कालावधीत जगातील ११ पैकी आठ उपप्रदेशांमध्ये युवा बेरोजगारी वाढली आहे.
- आर्थिक विकासाचा मंदावलेला वेग, अपुरी रोजगारनिर्मिती, भूराजकीय तणाव आणि तंत्रज्ञानातील वेगवान बदल यामुळे जग मोठ्या संकटाकडे वाटचाल करत आहे.
- उत्तर अमेरिकेत युवा बेरोजगारीचा दर २०२३मधील ८.३ टक्क्यांवरून २०२५मध्ये ९.८ टक्क्यांवर पोहोचला.
- उत्तर, दक्षिण आणि पश्चिम युरोपमध्ये २०२५मध्ये युवा बेरोजगारीचा दर १५ टक्के राहिला. या उपप्रदेशातील २९ पैकी २० देशांमध्ये तरुणांसाठी रोजगाराच्या संधी कमी झाल्या.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा रोजगारावर परिणाम
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अंदाजानुसार, १५ ते २९ वयोगटातील तरुणांकडे असलेल्या रोजगारांपैकी ६.१ टक्के रोजगार ‘एआय’मुळे होणाऱ्या बदलांना मोठ्या प्रमाणात सामोरे जाण्याची शक्यता आहे. यातील अनेक रोजगार २०२३पासून तरुणांमध्ये कमी होत असलेल्या मध्यम-कौशल्याच्या कामांशी संबंधित आहेत. विशेषतः कारकुनी आणि प्रशासकीय कामांचा समावेश आहे. विकसनशील देशांमध्ये वाढत्या तरुण लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी पुरेशा सन्मानजनक रोजगारांची निर्मिती करणे, हे मोठे आव्हान आहे. अनेक तरुण बेरोजगार राहण्याची आर्थिक क्षमता नसल्याने अनौपचारिक किंवा अस्थिर रोजगार स्वीकारत आहेत, त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण कमी दिसत आहे. मध्यम कौशल्याची अनेक पारंपरिक कामे कमी होत असल्याने तरुणांना स्थिर करिअरची सुरुवात करणे अधिक कठीण बनले आहे.
अरब देश, उत्तर आफ्रिकेतील परिस्थिती चिंताजनक
उप-सहारा आफ्रिकेत वाढती तरुण लोकसंख्या आणि अपुऱ्या सन्मानजनक रोजगारांच्या संधी यामुळे परिस्थिती विशेष गंभीर आहे. परिणामी रोजगार, शिक्षण किंवा प्रशिक्षणापासून दूर असलेल्या तरुणांची संख्या वाढत आहे. अरब देश आणि उत्तर आफ्रिका येथे जगातील सर्वाधिक युवा बेरोजगारीची नोंद झाली. अरब देशांमध्ये २०२५मध्ये युवा बेरोजगारीचा दर २६.२ टक्के, तर उत्तर आफ्रिकेत २२.६ टक्के होता. या दोन्ही प्रदेशांमध्ये किमान तीनपैकी एक तरुण ‘नीट’ असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
ज्या पिढीला सन्मानजनक रोजगार मिळत नाही, ती आत्मविश्वासाने आपले भविष्य घडवू शकत नाही. तरुणांना गुणवत्तापूर्ण रोजगारापासून दूर ठेवले गेले, तर देशांची प्रतिभा, उत्पादकता आणि सामाजिक एकोपा यांचे नुकसान होते.
- गिल्बर्ट एफ. हौंगबो,
महासंचालक, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.