दौंडला कर्जदारांच्या रकमेचा अपहार; एकास अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

दौंड - शहरातील एका वित्तीय संस्थेसाठी कर्जवसुली करणाऱ्या सचिन कदम या तरुणास अकरा कर्जदारांच्या एकूण ५ लाख १६ हजार रुपयांच्या अपहारप्रकरणी अटक करण्यात आली.

दौंड - शहरातील एका वित्तीय संस्थेसाठी कर्जवसुली करणाऱ्या सचिन कदम या तरुणास अकरा कर्जदारांच्या एकूण ५ लाख १६ हजार रुपयांच्या अपहारप्रकरणी अटक करण्यात आली.

दौंड पोलिसांनी या बाबत माहिती दिली. एचडीएफसी बॅंकेने दौंड तालुक्‍यातील शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाच्या रकमेपोटीचे हप्ते गोळा करून ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम कनेक्‍ट बिझनेस सोल्यूशन्स लिमिटेड या कंपनीमार्फत केले जाते. सचिन राजेंद्र कदम (वय ३१, रा. शालिमार बेकरी जवळ, कोर्ट रस्ता, दौंड) हा या कंपनीत मागील दोन वर्षांपासून कर्जवसुली विभागात कामाला होता. कंपनीने १४ जुलै रोजी बॅंकेचे कर्जदार नंदा कुदळे (रा. यवत) यांच्याशी संपर्क साधल्यानंतर सचिन कदम याने त्यांच्याकडून कर्ज थकबाकीपोटी घेतलेले ७८ हजार रुपये बॅंकेत न भरल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर कंपनीने इतर कर्जदारांकडे विचारणा केल्यानंतर सचिन कदम याने कर्जदारांना पावती न देता एकूण  अकरा कर्जदारांकडून हप्त्यांच्या रकमेपोटी जमा झालेली ५ लाख १६ हजार रुपयांची रक्कम स्वीकारल्याचे स्पष्ट झाले. 

ही रक्कम बॅंकेत न भरता वैयक्तिक कामासाठी वापरल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या बाबत कंपनीचे वसुली विभागाचे उपव्यवस्थापक साहिल जालियावाल (रा. ठाणे पश्‍चिम) यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सचिन कदम हा सध्या न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस कोठडीत आहे. 

भिशीत पैसे बुडाले?
दौंडमधील खासगी सावकारांचा मासिक चक्रवाढ व्याजदर व तगाद्यामुळे या रकमेचा अपहार करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. परंतु सहायक पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी धनंजय कापरे यांना मंगळवारी (ता. २१) या बाबत विचारले असता त्यांनी सचिन कदम याने ही रक्कम भिशीत लावली होती; परंतु भिशी बुडाल्याने त्याने अपहार केल्याचे सांगितले.

Web Title: youth was arrested in bribe cases