पुराच्या पाण्यात युवक वाहून गेला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

शिवणे : खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने मुठा नदीवरील शिवणे-नांदेड पुलावरून शनिवारी रात्री साडेनऊ वाजता पाणी वाहत होते. त्याचवेळी एका दुचाकीचालकाने पुलावरून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला; मात्र तो नदीतील पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्या तरुणाचा शनिवारी मध्यरात्री व रविवारी दिवसभर शोध घेतला. पण, तो सापडला नाही.

खडकवासला धरणाचा विसर्ग शनिवारी संध्याकाळी 13,448 क्‍युसेक केला होता. त्याचवेळी नांदेड पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे पोलिसांनी बॅरिकेटिंग, दोरी लावली होती. तो रस्ता व पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. रात्री साडेनऊच्या सुमारास नांदेड व शिवण्याकडे जाण्यासाठी 15-20 दुचाकी चालक आले होते. परंतु, पुलावरून पाणी जात असल्याने पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही. त्याऐवजी खडकवासला किंवा वारजे परिसरातील पर्यायी रस्त्याने जाण्याचा सल्ला दिला. "आम्ही दररोज या पुलावरून जातो. त्यामुळे हा रस्ता आम्हाला माहिती आहे. या पाण्यातून जाण्याची सवय आहे,' असे वाहनचालक पोलिसांना सांगत होते. या वेळी पोलिस आणि नागरिकांची नजर चुकवून एक युवक पुलावरून दुचाकी घेऊन पुराच्या पाण्यातून शिवण्याकडे जात होता. त्याचवेळी पाण्याचा जोर वाढल्याने तो नदीत पडला आणि वाहून गेला. त्यानंतर हवेली पोलिसांनी तातडीने पीएमआरडीए, महापालिकेच्या अग्निशामक दलास माहिती दिली.

रात्री दीड वाजेपर्यंत त्याचा नदीपात्रात शोध घेतला. दरम्यान, नदीतील पाण्याचा विसर्ग 15,129 क्‍युसेकने वाढल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. रविवारी सकाळी पुन्हा अग्निशामक दलाने या युवकाला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. त्याच्या गाडीचा नंबर अथवा त्याची ओळख अद्याप समजली नसल्याची माहिती हवेलीचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी सांगितली. 
 
Web Title: Youths were carried away in the flood waters