esakal | विजयादशमीच्या मुहूर्तावर झेंडूच्या भावात वाढ | Zendu Flower
sakal

बोलून बातमी शोधा

Zendu Flower
विजयादशमीच्या मुहूर्तावर झेंडूच्या भावात वाढ

विजयादशमीच्या मुहूर्तावर झेंडूच्या भावात वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड - साडेतीन मूहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी मार्केटयार्डातील फुलबाजारात झेंडूच्या फुलांची आवक वाढली आहे. तसेच मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे भावात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली. घाऊक बाजारात पिवळा आणि केशरी झेंडूला दर्जानुसार प्रतिकिलोला 50 ते 80 रूपये भाव मिळत आहे. तर शेवंतीच्या फुलांना 90 ते 140 रूपये भाव मिळत आहे. हा भाव शेतकर्‍यांना परवडणारा असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

बाजारात राज्यभरातून फुलांची आवक होत आहे. ही आवक मागणीच्या तुलनेत पुरेसी असल्याने भावात मोठी वाढ झाली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दीड वर्षांनंतर मंदिरे व धार्मिक स्थळे खुली झाली आहेत. त्यामुळे हेच भाव काही दिवस टिकून राहतील असा अंदाज व्यापारी अरूण वीर यांनी व्यक्त केला. मागील वर्षी याच दिवसांत शहरात लॉकडाऊन होता. तसेच मंदिरे व धार्मिक स्थळे बंद होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात फुलांची लागवड केली नव्हती. परिणामी 20 ते 25 टक्केच आवक होत होती. मात्र यावेळी शेतकर्‍यांनी दसर्‍यासाठी फुले राखून ठेवली होती. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे 75 ते 80 टक्क्यांनी फुलांची आवक वाढली आहे.

हेही वाचा: अल्पवयीन मुलांना शिविगाळ करुन दांडक्याने मारहाण; अ‍ॅट्रॉसिटीचा गु्न्हा दाखल

मागील वर्षी आवक मर्यादित असल्याने या काळात झेंडूच्या फुलांना किलोला 100 ते 150 रूपये, तर शेवंतीच्या फुलाला 200 ते 250 रूपये दर मिळाला होता. मात्र यावेळी आवक चांगली आहे. तसेच मागणीही आहे. त्यामुळे ग्राहक तसेच शेतकर्‍यांना परवडतील असेच भाव असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.

बाजारात विक्रीसाठी येणार्‍या झेंडूच्या फुलांत 20 ते 30 टक्के फुले भिजलेली आहेत. भिजलेल्या फुलांना भावही कमीच मिळत आहे. कोरड्या फुलांना अधिकचा दर मिळत आहे. पावसामुळे फुलांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. फुलांचे नुकसान झाले नसते, तर सद्य:स्थितीत बाजारात फुलांची विक्रमी आवक झाली असती. फुलांचे दरही घसरले असते.

- अरूण वीर, अध्यक्ष, आखिल फुलबाजार अडते असोसिएश

येथून होते आवक

पुणे जिल्ह्यातील यवत, माळशिरस, राजेवाडी, पुरंदर भागातून शेवंतीच्या फुलांची आवक होत आहे. पुणे, सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांतून झेंडूच्या फुलांची आवक होत आहे.

हेही वाचा: Pune Tourism | पुणेकरांच्या पर्यटनात चार महिन्यांत ७० टक्के वाढ

आपटा खातोय भाव

बाजारात आपट्याला चांगला भाव मिळत आहे. यामध्ये 20 रुपयांपासून 80 रुपयांपर्यंत आपट्याची गड्डी विकली जात होती. भोर, वेल्हा या भागातून अनेक शेतकरी, विक्रेते आपटा घेऊन बाजारात आले होते. दिवसभरात एक हजार ते दोन हजारापर्यंत याची विक्री होत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

घाऊक बाजारातील फुलांचे दर

फुले यंदाचा दर मागील वर्षीचा दर

पिवळा झेंडू 40 ते 60 रूपये - 100 ते 130 रूपये

केशरी झेंडू 40 ते 80 रूपये - 100 ते 150 रूपये

शेवंती 90 ते 140 रूपये - 200 ते 250 रूपये

loading image
go to top