Corona Updates: कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी प्रशासनानं कसली कंबर; विशेष उपाययोजनांवर भर!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण पुणे शहरात ९ मार्चला सापडला होता. तेव्हापासून सप्टेंबर अखेरपर्यंत कोरोनाचा वेगाने संसर्ग वाढला होता. त्यानंतर ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली होती.

पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. यानुसार फ्ल्यूसदृश आजार आणि समाजातील जास्त जनसंपर्क येत असलेल्या व्यक्तींचे नियमित सर्वेक्षण केले जाणार आहे. 

जिल्हा परिषदेच्या शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय; शाळा सुरु राहणार पण...​

यासाठी एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत (आयडीएसपी) ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय आणि शहरातील महापालिकेचे दवाखाने आणि निवडक खासगी रुग्णालयांमार्फत फ्ल्यूसदृश आजारांचे नियमित सर्वेक्षण करण्याचा आदेश राज्याच्या आरोग्य विभागाच्यावतीने सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि महापालिकांच्या आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. यानुसार फ्ल्यूसदृश जास्त रुग्ण आढळणाऱ्या भागात  कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविणे आणि गृहभेटीच्या माध्यमातून अशा व्यक्तींचे सर्वेक्षण केले जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Positive Story: पुण्यात विकसित होतेय 'हर्ड इम्युनिटी'; जाणून घ्या कशी करते काम

याशिवाय जास्त संपर्कात येणारे छोटे व्यावसायिक गट, घरगुती सेवा पुरविणाऱ्या व्यक्ती, वाहतूक व्यावसायिकांसाठी करणाऱ्या व्यक्ती आणि विविध विभागातील मजूर आदींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 

राज्यातील पहिला कोरोना रुग्ण पुणे शहरात ९ मार्चला सापडला होता. तेव्हापासून सप्टेंबर अखेरपर्यंत कोरोनाचा वेगाने संसर्ग वाढला होता. त्यानंतर ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली होती. ती १७ नोव्हेंबरपर्यंत कमी झाली आणि आता हळूहळू रूग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सत्ता हाती घेताच चीनला नियम पाळायला लावू; बायडेन ट्रम्प यांचाही निर्णय बदलणार​

लोकप्रबोधन करणार
कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या बाबींचे लोकांनी काटेकोरपणे पालन करावे, या उद्देशाने लोकप्रबोधन केले जाणार आहे. यामध्ये खालील उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे.
- हातांची स्वच्छता.
- गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर.
- सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व थुंकणे टाळणे.
- दोन व्यक्तींमध्ये शारिरीक अंतर राखणे.
- अनावश्यक प्रवास टाळणे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zilla Parishad administration ready to prevent second wave of corona in Pune district