सत्ता हाती घेताच चीनला नियम पाळायला लावू; बायडेन ट्रम्प यांचाही निर्णय बदलणार

वृत्तसंस्था
Friday, 20 November 2020

चीनला शासन करणे हा मुद्दा नसून त्यांना नियमांप्रमाणे वागायला लावणे आवश्‍यक आहे. याचसाठी आम्ही पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेमध्ये सहभागी होणार आहोत.

वॉशिंग्टन : चीनला आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करण्यास भाग पाडू, असे अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी शुक्रवारी (ता.२०) राज्यपालांच्या गटासमोर ठामपणे सांगितले. तसेच, जागतिक आरोग्य संघटनेतही अमेरिकेला पुन्हा सहभागी करून घेऊ, असेही बायडेन म्हणाले.

चीनच्या वर्तणुकीबद्दल त्यांना योग्य ते शासन करू, असे बायडेन यांनी अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान झालेल्या वादविवादात सांगितले होते. त्याची आठवण रून दिल्यावर बायडेन म्हणाले की, चीनला शासन करणे हा मुद्दा नसून त्यांना नियमांप्रमाणे वागायला लावणे आवश्‍यक आहे. याचसाठी आम्ही पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेमध्ये सहभागी होणार आहोत. पॅरिस पर्यावरण करारातही आम्ही सामील होणार आहोत. अमेरिका आणि जगातील इतर देश मिळून चीनला काही मर्यादा पाळायला भाग पाडू.

चिनी हवाई हद्दीत अमेरिकेने पाठवली बॉम्ब फेकणारी विमाने; दिला सज्जड दम​

जॉर्जियामध्ये बायडेन यांना बर्थ डे ‘गिफ्ट’
रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या जॉर्जिया राज्यात डेमोक्रॅटिक पक्षाने बाजी मारली आहे. येथे झालेल्या फेरमतमोजणीचा निकाल जाहीर झाला असून ज्यो बायडेन यांचा विजय घोषित झाला आहे. बायडेन यांना आज वयाची ७८ वर्षे पूर्ण झाली. वाढदिवसानिमित्त त्यांना विजयाची भेट मिळाली आहे. बरोबर दोन महिन्यांनंतर ते अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. १९९२ नंतर प्रथमच या राज्यात डेमोक्रॅटिक पक्षाचा विजय झाला आहे. यंत्राच्या साह्याने झालेल्या मतमोजणीत ट्रम्प आणि बायडेन यांच्या मतांमध्ये अल्प फरक असल्याने हाताने मतमोजणी करण्याचा निर्णय झाला होता. सुमारे ५० लाख मते मोजल्यानंतर बायडेन यांना ट्रम्प यांच्यापेक्षा १२, २८४ अधिक मते मिळाल्याचे सिद्ध झाले.

कोरोना जाता जात नाही​

आता ‘शटडाउन’ नाही
कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी आता संपूर्ण देशात लॉकडाउन करणार नसल्याचे ज्यो बायडेन यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. प्रत्येक राज्यातील, शहरातील परिस्थिती वेगवेगळी असल्याने संपूर्ण देशात टाळेबंदी करणार नाही. मात्र, विज्ञानाच्या मार्गाने जात मास्कचा वापर अनिवार्य करणार आहे, असे बायडेन यांनी सांगितले आहे.

भावा मला माफ कर, पण तेवढा मास्क घाल बघू​

ट्रम्प यांचे प्रयत्न सुरुच
अध्यक्षीय निवडणुकीतील निकालाला आव्हान देण्यासाठी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न सुरुच आहेत. पेनसिल्वानिया, मिशीगन आणि जॉर्जियासह इतर काही राज्यांमध्ये झालेल्या मतमोजणीला आव्हान देणार असल्याचे ट्रम्प यांच्या वकीलांनी आज पत्रकारांना सांगितले.

- जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China will have to play by rules and US will rejoin WHO says Joe Biden