आयुर्वेद, युनानीसाठी तब्बल ८४ कोटी

गजेंद्र बडे
बुधवार, 2 जानेवारी 2019

पुणे - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आगामी आर्थिक वर्षापासून (२०१९-२०) ॲलोपॅथीपेक्षा आयुर्वेद आणि युनानी उपचारपद्धतीला अधिक पसंती दिली आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या वार्षिक कृती आराखड्यात चालू आर्थिक वर्षाच्या (२०१८-१९) तुलनेत ६६ कोटी २१ लाख रुपयांची वाढ केली आहे. यामुळे आराखड्यातील निधीपैकी तब्बल ८४ कोटी ४७ लाखांचा निधी हा फक्‍त सरकारी आयुर्वेदिक दवाखान्यांची सुधारणा, देखभाल आणि औषधे व वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी प्रस्तावित केला आहे.

आगामी आर्थिक वर्षासाठी पुणे जिल्ह्याचा आरोग्याचा वार्षिक आराखडा ११२ कोटी ५५ लाख रुपयांचा आहे. चालू आर्थिक वर्षी हाच आराखडा केवळ २९ कोटी ३४ लाख ८५ हजार रुपयांचा होता. त्यापैकी आयुर्वेद व युनानीसाठी फक्त १८ कोटी २६ लाखांची तरतूद होती. हीच तरतूद आता ८४ कोटी ४७ लाख रुपयांची करण्यात आली आहे.  

जिल्ह्यातील ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ५३९ उपकेंद्रांसाठी केवळ २८ कोटी ८ लाखांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. ही प्रस्तावित तरतूद चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत १ कोटी २७ लाख ३५ हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य-सचिव आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने हा वार्षिक आराखडा तयार केला आहे. त्यास जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेनेही मंजुरी दिली आहे. 

१६ आरोग्य केंद्रांना मिळणार नव्या इमारती
जिल्ह्यातील १६ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी सुसज्ज आणि प्रशस्त अशा नवीन इमारती बांधण्यात येणार आहेत, त्यासाठी या आरोग्य आराखड्यात निधी प्रस्तावित केला आहे. १६ पैकी ९ केंद्रांच्या जुन्या इमारती पाडून, त्या नव्याने बांधल्या जाणार आहेत. उर्वरित ७ केंद्रांसाठी नव्यानेच या इमारती बांधण्यात येणार आहेत. यात नसरापूर (ता. भोर), म्हाळुंगे इंगळे, राजगुरुनगर व दावडी (सर्व ता. खेड), ऊर्से (ता. मावळ), परिंचे (ता. पुरंदर), कोरेगाव भीमा (ता. हवेली) आणि पानशेत (ता. वेल्हे) या केंद्रांचा, तर जुन्या इमारती पाडून नवीन इमारती बांधण्यात येणाऱ्यांत धामणी (ता. आंबेगाव), नानगाव (ता. दौंड), पळसदेव (ता. इंदापूर), कुंजीरवाडी (ता. हवेली), वारुळवाडी (ता. जुन्नर), तळेगाव दाभाडे (ता. मावळ) आणि मांडवगण फराटा (ता. शिरूर) या आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.

Web Title: Zilla Parishad Health Department eighty-four crores for Ayurveda & Unani