महापालिकेत नुकत्याच समाविष्ट गावांतील शिक्षक ‘झेडपी’कडेच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

शेतकरी विम्यावरून सभात्याग 
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळाली नसल्याचा मुद्दा सदस्या आशा बुचके यांनी उपस्थित केला. गेल्या तीन बैठकांमध्ये हा विषय उपस्थित होऊनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या कृषी आयुक्तांकडे पाठविल्या नसल्याचे बुचके यांनी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांना उद्देशून काही प्रश्‍न केले. शिवतरे यांनी तुम्ही अध्यक्षांना उद्देशून बोला, असे सांगितले. अध्यक्ष नवीन आहेत, म्हणून हा विषय निदर्शनास आणून देत असल्याचे बुचके यांनी सांगितले आणि शेतकऱ्यांना पीकविमा मिळत नसल्याच्या निषेधार्थ सभात्याग केला.

पुणे - जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये शिक्षकांच्या ६४० जागा  रिक्त आहेत. त्यामुळे महापालिकेत नुकत्याच समाविष्ट झालेल्या ११ गावांमधील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांना पालिकेकडे वर्ग न करता, त्यांना जिल्हा परिषदेच्याच सेवेत कायम ठेवण्याचा निर्णय बुधवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला, अशी माहिती अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची पुरेशी संख्या नाही. अनेक शाळांमध्ये किमान दोन ते तीन शिक्षकांची आवश्‍यकता असताना एकाच शिक्षकावर शाळेचा गाडा हाकावा लागत आहे. 

दरम्यान, महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांतील शाळांमधील शिक्षकांची संख्या १४८ आहे. त्यामुळे शाळा वर्ग केल्या असल्या तरी शिक्षकांना महापालिकेत वर्ग करण्यात येणार नाही, या शिक्षकांमुळे रिक्त पदांची संख्या कमी होण्यास मदत होणार असल्याचेही पानसरे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

काश्‍मीरमधील सहा जणांना पुण्यात राष्ट्रीय पुरस्कार

स्थायी समितीच्या बैठकीत विभागनिहाय खर्चाचा आढावा घेण्यात आला. निधी खर्चासाठी मार्च अखेरीची वाट न पाहता, उपलब्ध निधी जास्तीत जास्त खर्च करण्याचा प्रयत्न करावा, असा आदेशही त्यांनी या वेळी सर्व खातेप्रमुखांना दिला. या सभेत डीबीटी, अखर्चिक निधी, शेतकरी पीक विमा योजना आदी प्रमुख विषयांसह विविध विषयांवर चर्चा झाली.

शिक्षकांच्या बदल्यांसाठी अभ्यासगट
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या राज्यस्तरावरून होणाऱ्या ऑनलाइन जिल्ह्यांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्यांच्या धोरणात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा पाच सदस्यीय अभ्यासगट बुधवारी (ता. ५) स्थापन केला आहे. या अभ्यासगटाच्या अध्यक्षपदी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे अभ्यासगटाचे सदस्य-सचिव असणार आहेत. अन्य तीन सदस्यांमध्ये चंद्रपूर जिल्हा परिषदेचे राहुल कर्डिले, नंदुरबारचे विनय गौडा आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांचा समावेश आहे. 

शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांच्या प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्या आहेत. त्याचा अभ्यास करून, त्यात सुधारणा करणे, सरकारला बदल्यांबाबत शिफारशी सुचविण्यासाठी हा अभ्यासगट स्थापन केला आहे. या अभ्यासगटाने सोमवारी (ता. १०) काही शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि बदल्यांसंदर्भातील अनुभव यांचा अभ्यास करावा. त्याचा अहवाल मंगळवारी (ता. ११) सादर करण्याचा आदेश दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ZP the teacher of the village recently included in the municipality