Punjab Election: राजकीय दडपणापासून पोलिस मुक्त करू; कुंवर विजयप्रतापांची ग्वाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Punjab Police
Punjab Election: राजकीय दडपणापासून पोलिस मुक्त करू; कुंवर विजयप्रतापांची ग्वाही

Punjab Election: राजकीय दडपणापासून पोलिस मुक्त करू; कुंवर विजयप्रतापांची ग्वाही

चंडीगड : पोलिस यापुढे राजकारण्यांच्या हुकुमानुसार वागणार नाहीत. आम्ही राजकीय दडपणापासून पोलिसांना मुक्त करण्याची ग्वाही देतो, असे प्रतिपादन आपचे अमृतसर उत्तर मतदारसंघातील उमेदवार कुँवर विजयप्रताप सिंग यांनी केले. (Punjab Assembly Election Updates)

ते ५२ वर्षांचे आहेत. माझा परिसरातील नामवंत चेहरा म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी गेल्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली. जूनमध्ये ते आपमध्ये दाखल झाले. यंत्रणा स्वच्छ करण्याचा त्यांचा निर्धार आहे. ते म्हणाले की, पोलिसांच्या दैनंदिन कामातील राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. आम्ही पंजाब बचाओ मोहीम सुरु केली आहे. राजकीय परिवर्तन, क्रांती, बदल असे आमचे आव्हान असून सामान्य जनतेचा आम्हाला पाठिंबा मिळतो आहे. पंजाबमध्ये पोलिसांची कार्यपद्धती लोकाभिमुख आणि समाजाभिमुख बनेल.

हेही वाचा: कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी 'टनेल मॅन'? वाचा प्रेरणादायी संघर्ष

काही राजकारणी आणि माफियांमधील संगनमतामुळे अमली पदार्थांची समस्या कायम आहे. आम्ही हे साटेलोटे संपवू आणि यात हात असलेल्यांना तुरुंगात टाकू. यास बळी पडलेल्या युवकांवर उपचार करून त्यांचे पुनर्वसन करू, असेही त्यांनी सांगितले.

गेल्याच वर्षी राजकारणात आलेल्या कुँवर विजयप्रताप यांच्यासमोर काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील दत्ती आणि भाजपमधून शिरोमणी अकाली दलात प्रवेश केलेल्या अनिल जोशी यांचे आव्हान असेल. आपण केवळ उमेदवार आहोत आणि आपल्यासाठी खरी निवडणूक अमृतसरची जनता लढेल, अशी भावना कुँवर विजयप्रताप यांनी व्यक्त केली. २०१५ मध्ये फरिदकोटला धर्मग्रंथाच्या अवमान प्रकरणी पोलिसांनी गोळीबार केला होता. याप्रकरणी नेमण्यात आलेल्या विशेष चौकशी पथकात त्यांचा समावेश होता.

हेही वाचा: आकाशवाणीच्या स्थानिक केंद्रांवरील कार्यक्रम होणार बंद

आप सत्तेवर आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा, अमली पदार्थांचा भस्मासुर नष्ट करणे, महिलांच्या सुरक्षा, आरोग्य आणि शिक्षणाकडे खात्रीने लक्ष असे पक्षाचे प्राधान्याचे मुद्दे असल्याचे त्यांनी नमूद केले. आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल जी आश्वासने देतात त्याची पुर्तता करतात, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

अमृतसर मॉडेलसाठी पुढाकार

कुँवर विजयप्रताप यांनी अमृतसर मॉडेलचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, मी वरिष्ठ पोलिस अधिक्षक होतो तेव्हा सामान्य जनता आणि पोलिस एकत्र आले. मी दुहेरी भूमिका बजावायचो. एकीकडे गुन्हेगारी शक्तींविरुद्ध अत्यंत कडक धोरण ठेवले, तर दुसरीकडे सामान्य माणसांकडून आपुलकी आणि आदर मिळविला. लोकांच्या समस्या प्रत्येक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न केला. नंतर जालंधर, लुधियानात या मॉडेलचा अवलंब झाला.

Web Title: Punjab Assembly Election Updates Drl98

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top