
राज्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बजेटवर टीका केली आहे
'बजेट होते की, सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्प पत्र?'; बाळासाहेब थोरात यांची केंद्रावर टीका
मुंबई - कोरोनामुळे फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सरकार काय उपाययोजना करतंय, याकडे देशाचं लक्ष लागलं होतं. आज सकाळी 11 वाजल्यापासून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटच्या सादरीकरणास सुरवात केली. 'आत्मनिर्भर भारतासाठी बजेट' असं या बजेटचं वर्णन अर्थमंत्र्यांकडून करण्यात आलं आहे. अर्थमंत्री म्हणून त्यांनी सादर केलेले हे तिसरे बजेट आहे. अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेट नंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बजेटवर टीका करताना म्हटले की, सामान्य लोकांच्या हातात पैसे आणण्याऐवजी मोदी सरकारने देशाची मालमत्ता त्यांच्या उन्मत्त भांडवलदार मित्रांच्या हातात सोपवण्याचा कट आखला आहे. राज्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील या बजेटवर टीका करत म्हटले की, ''अर्थमंत्र्यांचे आजचे अर्थसंकल्पीय भाषण ऐकून, हा निवडणुकीचा जाहीरनामा होता की सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्प पत्र, हाच प्रश्न पडला आहे''.
बाळासाहेब थोरात यांनी काय म्हटले?
- अर्थमंत्र्यांचे आजचे अर्थसंकल्पीय भाषण ऐकून, हा निवडणुकीचा जाहीरनामा होता की सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्प पत्र, हाच प्रश्न पडला आहे.
- सगळे सरकारी प्रकल्प विकून आत्मनिर्भर भारताच्या पोकळ घोषणा अर्थमंत्र्यांनी दिल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील नफा कमावणारे प्रकल्प विकण्याचा सपाटाच मोदी सरकारने लावला आहे. मै देश नही बिकने दुंगा असे म्हणणारे मोदी खोटे बोलत होते यावर स्वत: अर्थमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले आहे.
- आजवर #LIC ही भारतीय नागरिकांसाठी सुरक्षित गुंतवणुकीचे माध्यम होती. आज एलआयसी विकण्याची घोषणा अर्थसंकल्पात झाली आहे. आपले भविष्य सुखकारक आणि सुरक्षित व्हावे म्हणून एलआयसीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कोट्यावधी लोकांचे भवितव्य यामुळे अंधारात ढकलले आहे.
- नियोजनशून्यरित्या लावलेल्या लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोक बेरोजगार झाले. छोटे व्यावसायिक देशोधडीला लागले, त्यांना हा अर्थसंकल्प समर्पित असेल अशी अपेक्षा होती. अर्थमंत्र्यांनी मात्र याबाबत चकार शब्दही काढलेला नाही.
- बिहार निवडणुकीच्या प्रचारावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिहारमध्ये भाजपची सत्ता आल्यावर मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली होती. आज अर्थसंकल्पात देशवासियांना मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली जाईल अशी अपेक्षा होती पण सरकारने देशाची निराशा केली.
- ज्या राज्यात निवडणुका आहेत त्याच राज्यात विकास प्रकल्पांची घोषणा करण्याची नवी पद्धत अर्थसंकल्पातून समोर आली आहे. जिथे निवडणुका नाहीत त्या राज्याला काही द्यायचे नाही हे केंद्राचे धोरण असल्याचे या अर्थसंकल्पातून समोर आले आहे. या सरकारने अर्थसंकल्पाला निवडणूक जाहीरनामा बनवले आहे.
- जीएसटीचे अवाजवी दर सरकार कमी करेल अशी अपेक्षा होती, मात्र त्या दरातही सरकारने कपात केली नाही. ही सर्वसामान्य गरिबांची मोठी फसवणूक आहे. यामुळे महागाई वाढतच जाणार आहे.
-------------------------------------------
mumbai latest political news balasaheb thorat criticize on budget 2021