मुंबई - सणासुदीच्या काळातील वाढलेली मागणी आणि वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) सुधारणांमुळे बहुतेक सर्व श्रेणींमधील वाहनांच्या विक्रीत चांगली वाढ झाल्याने देशातील वाहनउद्योगाने नोव्हेंबरमधील सर्वोत्तम विक्री नोंदवली आहे..प्रवासी वाहने, दुचाकी आणि तीन चाकी व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत सरासरी २० टक्क्यांनी वाढ झाली असून, ऑक्टोबरपाठोपाठ नोव्हेंबरमध्येही उच्चांकी विक्री झाल्याने वाहनउद्योगाने तेजीचा गिअर टाकला आहे. ग्राहकांचा उत्साह, सणासुदीच्या मागणीत वाढ आणि अनुकूल धोरणांमुळे, वाहनउद्योग येत्या वर्षातही वाढीचा कल कायम राखेल, अशी अपेक्षा सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स अर्थात ‘सियाम’ने व्यक्त केली आहे..‘सियाम’च्या आकडेवारीनुसार, प्रवासी वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमधील विक्रीच्या तुलनेत जवळजवळ १९ टक्क्यांनी वाढून ४,१२,४०५ मोटारींवर पोहोचली आहे. ही नोव्हेंबरमधील या विभागातील सर्वोच्च संख्या आहे. तीन चाकी वाहनांची विक्री २१.३ टक्क्यांनी वाढून ७१,९९९ वर पोहोचली आहे, तर दुचाकींची विक्री २१.२ टक्क्यांनी वाढून १९,४४,४७५ वर पोहोचली आहे..नोव्हेंबरमध्ये तीन चाकी वाहनांची विक्री २४.६ टक्क्यांनी वाढून ५९,४४६ वर पोहोचली. वस्तू वाहतूक करणाऱ्या वाहनांची विक्री १०.९ टक्क्यांनी वाढून १०,८७४ वर पोहोचली. इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीने संमिश्र कामगिरी नोंदवली. ई-रिक्षाची विक्री २५.६ टक्क्यांनी घसरून १,१३६वर आली, तर ई-कार्टची विक्री ८७.९ टक्क्यांनी वाढून ५४३वर पोहोचली..यामुळे इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये असमान गती दिसून आली. दुचाकी वाहनांच्या विभागाने नोव्हेंबरमधील सर्वोत्तम कामगिरी करत आपला वाढीचा प्रवास सुरू ठेवला. स्कूटर विक्री २९.४ टक्क्यांनी वाढून ७,३५,७५३ वर पोहोचली. स्कूटरला शहरी भागात चांगली मागणी आहे. मोटारसायकल विक्री १७.५ टक्क्यांनी वाढून ११,६३,७५१ वर पोहोचली..मोटारसायकल विक्रीतील वाढ ग्रामीण भागातील स्थिर मागणी आणि निमशहरी भागातील वाढत्या खरेदीमुळे झाली. मोपेड विक्रीत मात्र, २.१ टक्क्यांनी घसरण दिसून आली. नोव्हेंबरमध्ये ४४,९७१ मोपेडची विक्री झाली. एकूणच, नोव्हेंबरमध्ये दुचाकी उद्योगाने १९,४४,४७५ वाहनांची विक्री नोंदवली. हा मासिक विक्रीतील नवा मापदंड आहे, असे ‘सियाम’ने म्हटले आहे..सणांच्या कालावधीत वाहनांची होणारी मागणी आणि सरकारच्या प्रगतीशील जीएसटी सुधारणांमुळे मिळालेल्या पाठबळामुळे, देशातील वाहन उद्योगाने नोव्हेंबर २०२५ मध्ये विक्रीचा वेग कायम ठेवला. सातत्यपूर्ण धोरणात्मक सुधारणा आणि बाजारातील सकारात्मक वातावरण यामुळे २०२६मध्येही हा वाढीचा कल कायम राहील, अशी आशा उद्योगाला आहे.- राजेश मेनन, महासंचालक, सियाम.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.