
Developed India 2047: How Far Are We from the Dream?
E sakal
From Growth to Greatness: Will India Become a Developed Nation by 2047?
भूषण ओक
bhushanoke@hotmail.com
भारताला २०४७ पर्यंत एक ‘विकसित देश’ बनविण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आणि देशवासीयांचे स्वप्न आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेतून संपत्तीनिर्मिती आणि तिचे सर्वसामान्यांमध्ये यथायोग्य वितरण असे दुहेरी आव्हान भारतासमोर आहे आणि भारतीय नेतृत्व हे शिवधनुष्य कसे पेलते, यावरच भारताची प्रगती अवलंबून आहे. नक्की काय चांगले घडत आहे आणि अडचणी काय आहेत, याबद्दल ऊहापोह…
अर्थव्यवस्था आणि विकसित भारत या संज्ञा अलीकडे वरचेवर बातम्यांमध्ये आणि चर्चेतही असतात. भारताला २०४७ या वर्षापर्यंत एक ‘विकसित देश’ बनविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आणि देशवासीयांचे स्वप्न आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेच्या झालेल्या नेत्रदीपक प्रगतीमुळेच या स्वप्नाचा उगम झाला आहे.
विकसित भारताचा प्रवास हा अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या माध्यमातूनच होणार असल्याने या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जवळून निगडित आहेत. त्यामुळे आधी देश विकसित असणे म्हणजे काय आणि या प्रवासात आपण विकसित देशांच्या तुलनेत नक्की कुठे आहोत हे जाणून घेणे गरजेचे आहे.
विकसित भारत हा एक नारा आहे; पण भारत सध्या विकसित देशांच्या तुलनेत किती मागे आहे आणि भारताचे एका गरीब देशातून एका विकसित देशात रूपांतर होण्यासाठी आपल्याला किती वाटचाल करायची आहे, याची कल्पनाही सर्वांना असणे आवश्यक आहे.
भारताची अर्थव्यवस्था सद्यःस्थितीत सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून, काही वर्षांतच ती जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रगतीबद्दल सर्व भारतीयांना सार्थ अभिमान तर आहेच; पण त्याचबरोबर भारताची अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत आहे म्हणजे नक्की काय चांगले घडत आहे आणि अडचणी काय आहेत, हेही सर्वसामान्यांनी समजून घेणे गरजेचे आहे.