

Festive Season and Stock Market
esakal
निरंजन दांडेकर - niranjandandekar2007@gmail.com
भारतीय संस्कृतीत सण, उत्सव थाटामाटात साजरे केले जातात. सणाच्या शुभमुहूर्तावर आवर्जून सोनेखरेदी केली जाते. तसेच घर, वाहन इतर वस्तूंची खरेदी शुभमुहूर्तावर करण्याची परंपरा आहे. यामुळे नवरात्रीत घटस्थापनेपासून दसरा आणि दिवाळीपर्यंतच्या काळात वाहनांपासून इलेक्ट्रॉनिक्स, रिअल इस्टेट, पर्यटन, एफएमसीजी आणि सोने-चांदीपर्यंत विविध क्षेत्रांत खरेदी वाढते. त्याचा परिणाम कंपन्यांची विक्री, सरकारी महसूल आणि शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या अपेक्षांवरही दिसून येतो. बाजारातील कल, सणासुदीतील वाढणारी ग्राहक मागणी आणि विविध क्षेत्रांतील उलाढाल यांचा एकत्रित विचार केला, तर हा काळ भारतीय अर्थचक्राच्या गतीचा महत्त्वाचा निदर्शक ठरतो. ग्राहकांचा वाढता कल, विविध क्षेत्रांमधील वाढती मागणी आणि ऐतिहासिक तेजीचा पॅटर्न या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून भारतीय शेअर बाजार आणि एकूणच मॅक्रो-इकॉनॉमिक्स या काळात नव्या उंचीवर पोहोचते.
गेल्या अनेक दशकांपासून शेअर बाजारातील गुंतवणूकदार नवरात्र ते दिवाळी या काळाकडे विशेष लक्ष ठेवून असतात. या काळात ग्राहकोपयोगी वस्तू, बँकिंग आणि वाहन क्षेत्रातील कंपनांच्या शेअरमध्ये वाढीचा कल दिसून येतो. ऐतिहासिक आकडेवारीनुसार, नवरात्र ते दिवाळी या काळात बँकिंग शेअरनी १० पैकी सात वेळा, वाहन क्षेत्रातील शेअरनी आठ वेळा आणि कन्झ्युमर ड्युरेबलनी १० पैकी नऊ वेळा सकारात्मक परतावा दिला आहे. बाजारपेठेतील हा आशावाद केवळ भावनेवर आधारित नसून, त्यामागे आर्थिक घटकही आहेत. या काळात कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होतात. त्याच वेळी सणासुदीच्या खरेदीमुळे विक्री आणि नफ्यात वाढ होण्याची शक्यता बाजारातील गुंतवणूकदार आधीच गृहीत धरतात.
वर्ष कालावधी (नवरात्र ते दिवाळी) ‘सेन्सेक्स’ पातळी ‘सेन्सेक्स’ बदल (टक्के)
२०१५ १३ ऑक्टो. २०१५ – ११ नोव्हें. २०१५ २६,९५० – २७,२५० +१.११
२०१६ १ ऑक्टो. २०१६ – ३० ऑक्टो. २०१६ २७,८५० – २७,९३० +०.२९
२०१७ २१ सप्टें. २०१७ –१९ ऑक्टो. २०१७ ३१,९०० – ३२,५८० +२.१३
२०१८ १० ऑक्टो. २०१८ – ७ नोव्हें. २०१८ ३४,७०० – ३५,२४० +१.५६
२०१९ २९ सप्टें. २०१९ – २७ ऑक्टो. २०१९ ३८,८०० – ३९,८३० +२.६५
२०२० १७ ऑक्टो. २०२० – १४ नोव्हें. २०२० ४०,०५० – ४३,६३० +८.९४
२०२१ ७ ऑक्टो. २०२१ – ४ नोव्हें. २०२१ ५९,८५० – ६०,०७० +०.३७
२०२२ २६ सप्टें. २०२२ – २४ ऑक्टो. २०२२ ५७,१५० – ५९,३०० +३.७६
२०२३ १५ ऑक्टो. २०२३ – १२ नोव्हें. २०२३ ६५,६०० – ६४,९०० -१.०७
२०२४ ३ ऑक्टो. २०२४ – १ नोव्हें. २०२४ ८२,५०० – ७९,७२० -३.३७
२०२५ २२ सप्टें. २०२५ – २१ ऑक्टो. २०२५ ८२,१५९ – ८४,४२६ +२.६७
सरासरी +१.७१%