Finance Planning After 50 :पन्नाशीनंतरचे आर्थिक नियोजन कसे करावे? १२ महत्त्वाचे संकल्प करा
kirang.gandhi@gmail.com
प्रत्येक व्यक्ती साधारणपणे साठ वर्षानंतर नोकरी, व्यवसायातून निवृत्त होऊन आरामदायी आयुष्य जगण्याचा विचार करत असते. त्यासाठी कमावण्याच्या वयात निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आर्थिक तरतूद करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे असते.
त्या अनुषंगाने काही संकल्प करून आर्थिक गुंतवणूक केल्यास निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखकर, तणावमुक्त आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्रपणे जगणे सहजशक्य होईल.
१) आपल्याला समजत नसलेल्या व्यवसायात गुंतवणूक न करणे
सेवानिवृत्त नागरिक करीत असलेल्या सर्वांत सामान्य आर्थिक चुकांपैकी एक म्हणजे, आपल्याला पूर्णपणे समजत नसलेल्या व्यवसायांमध्येही ते गुंतवणूक करतात. मित्रांनी किंवा नातलगांनी भरीला घातल्यामुळे भविष्यात उच्च परतावा मिळण्याचे आश्वासन देणाऱ्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचे प्रकार घडतात.
अल्प कालावधीत नफा किंवा भावनिक समाधान देणारे हे व्यवसाय मोठे आकर्षक असतात. मात्र, त्यात जोखीमही मोठी असते. बेकायदेशीर व्यवसाय किंवा भागीदारीमध्ये गुंतवणूक करून अनेक सेवानिवृत्तीनंतर मिळालेली संपूर्ण बचत गमावतात.
हा तोटा जेव्हा स्पष्टपणे दिसू लागतो, तेव्हा पुन्हा भांडवल उभे करण्यासाठी किंवा बचतीची फेरबांधणी करण्यासाठी उशीर झालेला असतो. म्हणून एखादा व्यवसाय कसा चालतो किंवा त्यात परतावा कसा मिळतो हे समजत नसेल, तर आपण त्यात गुंतवणूक करू नये.
आपल्या सेवानिवृत्तीपश्चातच्या उद्दिष्टांशी जुळणाऱ्या, सुरक्षित, चांगल्या प्रकारे संशोधन केलेल्या योजनांवर लक्ष केंद्रित करावे. आपले कष्टाने कमावलेले पैसे धोक्यात येणार नाहीत, याची खात्री हा संकल्प देतो.

