post 50 investment
Esakal
लक्ष्मीकांत श्रोत्री - lshrotri@hotmail.com
पन्नाशीनंतरचे वय म्हणजे आयुष्याच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात. या टप्प्यावर आर्थिक स्थिरता, आरोग्य आणि निवृत्तीनंतरचा काळ यांचा विचार करून शहाणपणाने निर्णय घेणे अत्यावश्यक असते. वयाच्या पन्नाशीच्या पुढे पाऊल टाकल्यानंतर गुंतवणुकीचे उद्दिष्ट बदलते. या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यातील आर्थिक नियोजनासंदर्भात मार्गदर्शन करणारा हा लेख...
वयाच्या पन्नाशीनंतरचा काळ आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. या वयात निवृत्ती जवळ येत असते, मुले स्वावलंबी होत असतात आणि आरोग्याशी संबंधित गरजा वाढत असतात. पूर्वी साधारणपणे ६० वर्षे हे निवृत्तीचे वय असायचे; पण आता काळ बदलतोय. खासगी कंपन्यांमध्ये हे वय आता कमी झाले आहे. काही वेळा स्वेच्छेने किंवा काही वेळा व्हीआरएस अथवा ले-ऑफमुळे निवृत्तीची वेळ आधीच येते. महागाईचे प्रमाण आणि जीवनशैली याचासुद्धा खूप मोठा परिणाम होऊ शकतो. वाढत्या वैद्यकीय संशोधनामुळे आयुर्मानही वाढते आहे. त्यामुळे आर्थिक नियोजनाचे महत्त्व खूप जास्त आहे.
पन्नाशीनंतरचे वय म्हणजे आयुष्याच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात. या टप्प्यावर आर्थिक स्थिरता, आरोग्य आणि निवृत्तीनंतरचा काळ यांचा विचार करून शहाणपणाने निर्णय घेणे अत्यावश्यक असते. वयाच्या पन्नाशीच्या पुढे पाऊल टाकल्यानंतर गुंतवणुकीचे उद्दिष्ट बदलते. तरुण वयात जास्तीचा परतावा हे ध्येय असते; पण पन्नाशीनंतर गुंतवणुकीचा उद्देश असतो भविष्यातील स्थिर उत्पन्न, जोखमीपासून बचाव आणि निवृत्तीनंतरचा खर्च भागवणे. या लेखात आपण पन्नाशीनंतरच्या आर्थिक नियोजनासाठी काही महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. तसेच आर्थिक नियोजन करताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात, हेही पाहू या.
उच्च जोखमीची गुंतवणूक टाळा ः शेअर, क्रिप्टोकरन्सी किंवा अनोळखी स्कीममध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे धोकादायक असू शकते. यामुळे निवृत्तीनंतरचा आर्थिक आधार ढासळू शकतो.
कर्ज घेणे टाळा ः या वयात नवे कर्ज घेणे टाळा. होम लोन, पर्सनल लोन यामुळे मासिक बजेटवर भार येतो आणि मानसिक तणाव वाढतो.
अपारदर्शक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका ः ‘दुहेरी रक्कम मिळवा’ किंवा ‘दोन वर्षांत पैसे दुप्पट’ अशा फसवणूक करणाऱ्या योजनांपासून दूर राहा. मुदतठेव, म्युच्युअल फंड, सरकारी योजनांवर भर द्या.
सगळे पैसे एका ठिकाणी ठेवू नका ः सगळे पैसे एकाच प्रकारात (उदा. फक्त रिअल इस्टेट) गुंतवू नका. विविध साधनांमध्ये योग्य प्रमाणात विभागणी करा.