

ICICI Prudential Balanced Advantage Fund performance
esakal
संतोष शाह- म्युच्युअल फंड वितरक
भू -राजकीय तणाव वाढत असल्यामुळे शेअर बाजारात मंदीला चालना मिळत आहे. त्यामुळे शेअर बाजारात ‘अनिश्चितता’ हीच एकमेव निश्चित गोष्ट आहे, यावर शिक्कामोर्तब होते. काही दिवसांच्या आत वातावरणात झालेल्या या महत्त्वपूर्ण बदलामुळे गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजाराबाबत सावध झाले आहेत. एका वेळेस भारतीय बाजारपेठेबाबत आशावादी असलेल्या परदेशी गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात ६.८ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली, ती गेल्या नऊ महिन्यांतील उच्चांकी होती. तेच आता तिच्याकडे पाठ फिरवत आहेत. भू-राजकीय तणावामुळे या मालमत्तावर्गाचे आकर्षण कमी होत आहे. याचा परिणाम म्हणजे भारतीय शेअरच्या शाश्वततेवरील विश्वासाला तडा जात आहे. भारतीय शेअर हे जागतिक पातळीवर सर्वांत महागड्या बाजारपेठांपैकी एक होते. त्यात आता हळूहळू मॅक्रोइकॉनॉमिक निर्देशांक खाली येत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शेअर बाजाराने १९७९ पासून सरासरी १५.९ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. त्यामुळे ती दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक महत्त्वाची मालमत्ता बनली आहे. मात्र, तोदेखील अस्थिरतेच्या धक्क्यापासून मुक्त नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे.