

India FDI Growth 2026
esakal
डॉ. केदार विष्णू - kedar.vishnu@manipal.edu
डॉ. प्रतिभा नेहरकर - ladlikedar@gmail.com
जागतिक आर्थिक अस्थिरता, पश्चिम आशियातील संघर्ष, परकी भांडवलाचा सतत बाहेर जाणारा ओघ आणि मंदावलेली जागतिक गुंतवणूक यांसारख्या आव्हानांमध्येही भारताने फेब्रुवारी २०२६मध्ये विक्रमी थेट परकी गुंतवणूक (एफडीआय) नोंदवली. यामागे मजबूत आर्थिक पाया, सुधारलेला गुंतवणूकदारांचा विश्वास आणि केंद्र सरकारच्या नव्या धोरणात्मक निर्णयांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे दिसून येते.
जागतिक अस्थिरता, भांडवलाचा बहिर्प्रवाह आणि पश्चिम आशियातील सततचा संघर्ष यांसारख्या आव्हानांनंतरही भारताच्या एकूण थेट परकी गुंतवणुकीत (एफडीआय) लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरील गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास अधोरेखित होतो. गेल्या चार वर्षांत भारतीय धोरणकर्त्यांनी निर्यातीद्वारे दरडोई उत्पन्न वाढवणे आणि उत्पादन क्षेत्राला चालना देणे यावर विशेष भर दिला आहे, जेणेकरून ‘विकसित भारत २०४७’ हे उद्दिष्ट साध्य करता येईल. या पार्श्वभूमीवर, जागतिक बाजारातील अनिश्चिततेचा भारतातील ‘एफडीआय’वर झालेला परिणाम आणि ‘एफडीआय’ वाढवण्यासाठी भारताने आखलेल्या नव्या धोरणांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. जवळपास चार वर्षांनंतर, फेब्रुवारी २०२६ मध्ये भारताने विक्रमी ‘एफडीआय’ आवक कशी नोंदवली, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.