
पंकज पाटील
fincircleindia@gmail.com
गुंतवणुकीच्या जगात, वेळ म्हणजे केवळ एक भाग नसून, तो मुख्य पात्र आहे. जितक्या लवकर गुंतवणुकीला सुरुवात केली जाते, तितका वेळ तुमच्या पैशासाठी काम करतो. वेळ म्हणजे सुपीक मातीसारखा आहे. तुमची गुंतवणूक जितकी जास्त काळ रुजलेली राहील, तितकी त्याची मुळे खोलवर वाढतील आणि ती अधिक फळे देतील. त्यामुळे वेळ अतिशय महत्त्वाची आहे.
आपली संपत्ती वाढावी असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र, त्यासाठी नेमके काय करायचे याची माहिती नसते किंवा असली तरी त्याची अंमलबजावणी केली जात नाही. तुम्हाला तुमची संपत्ती वाढवायची असेल, तर सर्वांत महत्त्वाचे आहे वेळ पाळणे. ‘टाइम इज मनी’ ही उक्ती सर्वांना माहीत आहे. परंतु, त्याचा प्रत्यक्ष पैसा वाढवण्यात कसा फायदा होतो, ते अनेक जण लक्षात घेत नाहीत. गुंतवणुकीचे एक महत्त्वाचे सूत्र आहे, ते म्हणजे लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करा. जितक्या लवकर गुंतवणूक तितकी अधिक संपत्ती.