

IT companies in India
sakal
भारताच्या आर्थिक विकासात आयटी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. या क्षेत्रातील कंपन्यांचे वर्गीकरण आयटी सेवा (इन्फोसिस, टीसीएस, विप्रो), आयटी उत्पादने (मायक्रोसॉफ्ट, गूगल, अडोब), क्लाऊड सेवा (अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, अझुअर, इन्फोसिस, टीसीएस) आणि आयटी हार्डवेअर (एनव्हिडिया, मॉसचिप) अशा चार प्रकारांत होते. मात्र, आयटी हार्डवेअर वगळता बहुतेक कंपन्या सर्व क्षेत्रात थोड्याबहुत प्रमाणात काम करतात. इंजिनीअरिंगच्या क्षेत्रात ‘ईआरडी’ सॉफ्टवेअर कंपन्या (केपीआयटी, टाटा एलेक्सी) हाही एक उपप्रकार आहे. मात्र, काही कंपन्या फक्त सॉफ्टवेअर उत्पादने पुरविण्याच्या क्षेत्रात काम करतात. भारतात न्यूजेन सॉफ्टवेअर आणि इंटलेक्ट डिझाइन अरेना या अशा दोन कंपन्या आहेत. अशा कंपन्या आधी भांडवली गुंतवणूक करून संशोधन आणि विकासाद्वारे इतर कंपन्यांना लागणारी सॉफ्टवेअर उत्पादने विकसित करतात. त्यानंतर त्यांचे मार्केटिंग करावे लागते. उत्पादने विकली गेली, की मग उत्पन्न सुरू होते. बाजाराच्या गरजेप्रमाणे नवी उत्पादने विकसित करणे सुरू ठेवावे लागते. पण उत्पादने विकली, की या कंपन्यांना एकरकमी (लायसन्स) आणि वार्षिक शुल्क मिळते. उदा. ‘न्यूजेन’च्या वार्षिक उत्पन्नाचा जवळजवळ ६० टक्के वाटा वार्षिक शुल्कातून येतो. त्यामुळे तितक्या उत्पन्नाची नक्की खात्री असते. नवी उत्पादने विकली, की हा वाटाही वाढत जातो.