Adani Group : ‘अदानीं’च्या प्रकल्पास जुन्नरमध्ये विरोध

जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागातील घाटघर व अंजनावळे येथील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पासाठी सर्वेक्षणाच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत.
‘अदानीं’च्या प्रकल्पास जुन्नरमध्ये विरोध
‘अदानीं’च्या प्रकल्पास जुन्नरमध्ये विरोधSakal

जुन्नर : जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागातील घाटघर व अंजनावळे येथील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पासाठी सर्वेक्षणाच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, तर काही शेतकरी भूमिहीन होणार असून, विस्थापित होण्याची भीती असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांचा या प्रकल्पास असणारा विरोध कायम आहे.

अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून घाटघर व अंजनावळे (लव्हाळी) ग्रामपंचायतीच्या हद्दीत माळशेज घाट भोरांडे पंप स्टोरेज प्रकल्पाच्या (पीएसपी) विकासासाठी टोपोग्राफी आणि जिओ फिजिकल इन्व्हेस्टिगेशनची कामे करण्यासाठी सर्व्हे करण्यात येणार असल्याचे समजते. या प्रकल्पासाठी आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार असल्याने या प्रकल्पास स्थानिक पातळीवर विरोध होत आहे.

राज्य सरकारचा ऊर्जा विभाग व अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी यांच्यामध्ये २८ जून २०२२ मध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार ऊर्जा साठवण प्रणाली, तसेच इतर अक्षय ऊर्जा स्रोत प्रकल्पाच्या घाटघर व अंजनावळे गावातील सर्व्हे अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधीमार्फत करण्यात येणार आहे. त्यांना सहकार्य करावे, असे पत्र तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी मागील वर्षी ग्रामपंचायतीला दिले होते. तसेच, मदतीसाठी तलाठी व मंडल अधिकारी सोबत दिले होते.

मागील वर्षी सर्वेक्षणास आलेल्या कर्मचाऱ्यांना विरोध झाल्याने सर्वेक्षण झाले नाही. त्यामुळे आता तीन दिवसांपूर्वी ड्रोन फिरत असल्याचे दिसल्याने सर्व्हेसाठी या भागात ड्रोनचा वापर होत असावा, असे माजी सरपंच पोपट रावते यांनी सांगितले.

‘पेसा कायद्याची पायमल्ली’

आदिवासी भागातील अनुसूचित क्षेत्रात येणाऱ्या गावात ‘पेसा’ कायदा लागू आहे. या कायद्यानुसार या क्षेत्रात कोणताही प्रकल्प सुरू करायचा झाल्यास त्या प्रकल्पाला ग्रामसभेची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. या प्रकल्पासाठी मात्र कोणत्याही प्रकारची ग्रामसभांची मान्यता घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आदिवासींच्या हक्कासाठी असणाऱ्या पेसा कायद्याची शासनाकडूनच पायमल्ली केली जात असल्याचे सरपंच मनोज नांगरे यांनी सांगितले.

कोल्हापुरातील प्रकल्प रद्द

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होणाऱ्या अदानींच्या हायड्रो इलेक्ट्रिक वीजनिर्मिती प्रकल्पाला कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव धरणातील पाणी देण्यास गावातील नागरिकांनी विरोध केला होता. त्यासाठी आंदोलन केले होते. अखेर ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश आले. २३ जानेवारी २०२४ रोजी संबंधित प्रकल्प रद्द केला आहे.

साताऱ्यातील प्रकल्पाला विरोध

सातारा जिल्ह्यातही अदानींचा प्रकल्प होत आहेत. त्यामधील पाटण तालुक्यातील डांगीस्तेवाडी गावात अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडकडून तारळी पंप स्टोरेज हायड्रो प्रोजेक्ट उभारणीचा प्रस्ताव दिला आहे. तारळी पीएसएचपी प्रकल्पाची उभारणी पाटण तालुक्यातील डांगिस्तेवाडी येथे प्रस्तावित आहे. त्याच्या जवळ पाटण तालुक्यातील निवडे गावात अजून एक अतिरिक्त धरण बांधले जाणार आहे. शेतकऱ्यांसह श्रमिक मुक्ती दलाने या प्रकल्पांना विरोध दर्शविला आहे.

या कारणांमुळे विरोध...

  • सह्याद्रीच्या रांगांमधील निसर्गातील जैवविविधतेला धोका निर्माण होणार असल्याची पर्यावरणप्रेमींकडून भीती.

  • नाणेघाट परिसरात गेल्या काही वर्षांत वाढीस लागलेल्या पर्यटनास खीळ बसण्याची व्यावसायिकांना चिंता.

  • आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार. काही शेतकरी भूमिहीन होणार. विस्थापित होण्याची भीती.

राज्य सरकारचा ऊर्जा विभाग व अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनी यांच्यातील सामंजस्य करारानुसार ऊर्जा साठवण प्रणाली, तसेच इतर अक्षय ऊर्जा स्रोत प्रकल्पाच्या घाटघर व अंजनावळे गावातील सर्व्हेसाठी सहकार्य करावे, याविषयी ग्रामपंचायतींना कळविले होते, तसेच मदतीसाठी तलाठी व मंडल अधिकारी सोबत दिले होते. त्यांनतर गेल्या वर्षभरात पुन्हा याविषयी कंपनीकडून काही हालचाल झाली नाही.

— रवींद्र सबनीस, तहसीलदार, जुन्नर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com