
Elon Musk : इलॉन मस्कचे ट्विट चर्चेत; आता 'ही' दिवाळखोर बँक करणार खरेदी
Silicon Valley Bank Crisis : अमेरिकेसह संपूर्ण जगाला स्टार्टअप फंडिंग देणाऱ्या सिलिकॉन व्हॅली बँकेला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
अमेरिकन नियामकाने या बँकेला कुलूप लावण्याचे आदेश दिले आहेत, कारण तिची आर्थिक स्थिती खूपच कमकुवत झाली आहे. त्याचबरोबर भारतीय गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.
बँक बंद झाल्याची बातमी पसरताच ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांचे एक ट्विटही खूप व्हायरल झाले. जगातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांनी ही बँक खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे.
मस्क ही बँक विकत घेतील का?
अमेरिकन बँक सिलिकॉन व्हॅली बंद झाल्याच्या वृत्ताचा अमेरिकेसह जगभरातील बाजारांवर परिणाम झाला आहे. बँक बंद झाल्याच्या बातम्यांदरम्यान इलॉन मस्क यांनी ही बँक खरेदी करण्यात रस दाखवला आहे.
रेझरचे सीईओ मिन लियांग यांनी ट्विटरवर लिहिले की, ट्विटरने बंद असलेली सिलिकॉन व्हॅली बँक खरेदी करावी. ती विकत घेऊन डिजिटल बँक बनवावी. ज्याच्या उत्तरात इलॉन मस्कने लिहिले की, मी तुमच्या कल्पनेचे स्वागत करतो आणि मी त्यासाठी तयार आहे.
इलॉन मस्कने याआधीही त्याने असे अनेक सौदे केले आहेत. अशा परिस्थितीत मस्कचे हे ट्विट खूपच व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे, कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशनने सिलिकॉन व्हॅली बँकेची आर्थिक स्थिती पाहून ती बंद करण्याचे निर्देश दिले. FDIC वर बँकेच्या ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सिलिकॉन व्हॅली बँक ही अमेरिकेतील 16 वी सर्वात मोठी बँक आहे ज्याची मालमत्ता 210 अब्ज डॉलर आहे. व्याजात वाढ झाल्यामुळे बँकेची अवस्था बिकट होत गेली. सिलिकॉन व्हॅली बँक टेक कंपन्या आणि नवीन उपक्रमांना आर्थिक सहाय्य पुरवते.
व्याजदर वाढल्यामुळे या कंपन्यांची अवस्था बिकट होऊ लागली आणि त्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. बँकेचे कर्ज बुडू लागले. त्यानंतर बँकेची आर्थिक स्थिती ढासळत गेली.
2008 नंतरचे सर्वात मोठे बँकिंग संकट :
स्टार्टअप केंद्रित कर्जदार बँक सिलिकॉन व्हॅली फायनान्शियल ग्रुप 2008 नंतरचे सर्वात मोठे बँकिंग संकट म्हणून उदयास आले आहे. शुक्रवारी समूहाचे शेअर्स 70 टक्क्यांनी घसरले होते.
कॅलिफोर्निया बँकिंग नियामकाने ही बँक बंद करून फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनला रिसीवर म्हणून नियुक्त केले आहे.
सिलिकॉन व्हॅली बँकचे प्रमुख कर्मचाऱ्यांना काय म्हणाले :
सिलिकॉन व्हॅली बँकच्या प्रमुखांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे कर्मचाऱ्यांना सांगितले की, बँकिंग नियामकासह भागीदार शोधण्याचे काम केले जात आहे.