‘ईटीएफ’चा पर्याय महिलांसाठी लाभदायी

‘ईटीएफ’ हा म्युच्युअल फंडासारखाच एक गुंतवणूक फंड आहे. ‘ईटीएफ’द्वारे शेअर बाजार निर्देशांक, सेक्टर इंडेक्स, बाँड, सोने, चलन आदींमध्ये गुंतवणूक केली जाते.
etf investment like mutual fund for women finance planning
etf investment like mutual fund for women finance planning Sakal

- नेहा लिमये

सध्याच्या डिजिटल युगात आपल्याला सगळं झटपट, हाताच्या एका बोटावर हवं असतं. स्मार्ट वॉचमध्ये म्युझिक प्लेअर, फूड-अॅपमध्ये भाजी-किराणा घरपोच मागवायची सोय, ही त्याचीच उदाहरणे. याच लाटेवर स्वार होऊन शेअर बाजारामध्ये एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) उदयाला आले. शेअर आणि म्युच्युअल फंड या दोन्हींचे फायदे यात मिळत असल्यामुळे अल्पावधीत लोकप्रियदेखील झाले.

‘ईटीएफ’ म्हणजे काय?

‘ईटीएफ’ हा म्युच्युअल फंडासारखाच एक गुंतवणूक फंड आहे. ‘ईटीएफ’द्वारे शेअर बाजार निर्देशांक, सेक्टर इंडेक्स, बाँड, सोने, चलन आदींमध्ये गुंतवणूक केली जाते. त्यामुळे ‘ईटीएफ’मध्ये गुंतवणूक म्हणजे एकाच वेळी वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक. सध्या बाजारात विविध प्रकारचे ईटीएफ उपलब्ध आहेत. उदा. इंडेक्स (निर्देशांक) ईटीएफ, सेक्टर ईटीएफ, गोल्ड ईटीएफ, सिल्व्हर ईटीएफ, बाँड ईटीएफ, चलन ईटीएफ, आंतरराष्ट्रीय ईटीएफ आदी.

‘ईटीएफ’ची खरेदी-विक्री

‘ईटीएफ’ची शेअर बाजारात नोंदणी करावी लागते, त्यामुळे शेअर बाजाराच्या कामकाजाच्या वेळेत शेअरप्रमाणे ‘ईटीएफ’ची खरेदी व विक्री करता येते. ‘ईटीएफ’मध्ये गुंतवणूक करण्यासाठी बँक खाते, डी-मॅट खाते आणि ट्रेडिंग खाते असणे आवश्यक आहे. खरेदी किंवा विक्री केलेल्या ईटीएफ युनिटची नोंद आपल्या डी-मॅट खात्यात होत असते.

‘गोल्ड ईटीएफ’चा पर्याय

मागच्या शतकभराचा गुंतवणुकीचा इतिहास बघितला, तर सोने हे जगातील सर्वाधिक मागणी असलेले गुंतवणूक उत्पादन आहे. काळानुसार त्याचे मूल्य सतत वाढत गेले आहे. शेअरच्या तुलनेत सोने कमी अस्थिर आहे. कर्जसापेक्ष तारण म्हणूनही त्याचा वापर केला जाऊ शकतो. भौतिक सोन्याच्या तुलनेत गुंतवणूक परताव्याद्वारे उत्पन्न देत असल्यामुळे ‘गोल्ड ईटीएफ’ हा एक चांगला गुंतवणूक पर्याय ठरतो.

आपण भारतीय माणसे आणि विशेषतः भारतीय महिला सोन्यात गुंतवणूक करण्याबद्दल नेहमीच उत्सुक, आग्रही असतात. सणावाराला किंवा लग्नसराईत आपल्याकडे अजूनही सोन्याला महत्त्व आहे. सोन्याचे भाव सतत चढ दिसतात, शिवाय आजकाल जवळ बाळगायची भीती असते.

‘गोल्ड ईटीएफ’चे फायदे

‘गोल्ड ईटीएफ’मध्ये गुंतवणूक केल्याने बनावट सोनेखरेदीची भीती नाहीशी होते. भौतिक सोन्याच्या तुलनेत ‘गोल्ड ईटीएफ’ची किंमत कमी आहे. कारण कोणतेही अधिकचे मूल्य किंवा मेकिंग चार्जेस नसतात. त्यामुळे अगदी कमी पैशातही (प्रत्येक युनिट एक ग्रॅम सोन्याइतके असल्याने) गुंतवणूक करता येते.

‘गोल्ड ईटीएफ’ची खरेदी आणि विक्री मनात येईल तशी आणि तेवढी करता येते. एकाच दिवसात वेगवेगळ्या किमतीलाही ‘गोल्ड ईटीएफ’ खरेदी करता येतात. ‘गोल्ड ईटीएफ’ विकले/रीडीम केले, तर त्यावेळी सोन्याचा भाव काहीही असो, आपल्याला पैसे त्यावेळच्या ‘नेट अॅसेट व्हॅल्यू’नुसारच (एनएव्ही) मिळतात.

त्यामुळे खरेदी-विक्री करताना सोन्याच्या भावातील चढ-उताराचा फायदा करून घेता येतो. ही खरेदी-विक्री ऑनलाइन पद्धतीने आणि डी-मॅट खात्यातून होते, त्यामुळे देखभालीचा खर्च, जोखीम दोन्ही नसते.

थोडक्यात, सोने आणि शेअर या दोन्हींचे फायदे देणारा ऑल-इन-वन, किफायतशीर, दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय म्हणजे ‘गोल्ड ईटीएफ’. तेव्हा येत्या महिला दिनाच्या निमित्ताने ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये गुंतवणूक करायला सुरवात करता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com