

Loan Recovery Agent Harassment Complaint
सुधाकर कुलकर्णी , सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी
आजकाल बहुतांश लोक घर, वाहन, शिक्षण, व्यवसाय यासाठी बँका, सहकारी बँका, पतपेढ्या, बिगरबँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) यांच्याकडून कर्ज घेतात. काहीवेळा कर्जदार आजारपण, धंद्यातील नुकसान, अपघात, नोकरी जाणे यांसारख्या कारणांमुळे कर्जाची अपेक्षित परतफेड करू शकत नाहीत. अशा वेळी संबंधित बँक अथवा ‘एनबीएफसी’ कर्जदाराला लेखी, तोंडी, एसएमएस/मेल किंवा प्रत्यक्ष भेटून कर्जाची परतफेड करण्याबाबत सूचना देत असते. कर्जवसुली होत नसेल, तर कायदेशीर कार्यवाही करण्यापूर्वी मध्यस्थाकडे (एजंट) वसुलीचे काम दिले जाते. अशा एजंटांकडून (विशेषत: ‘एनबीएफसी’कडून नेमण्यात आलेल्या एजंटांकडून) कर्जदाराला त्रास देण्यात आल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या असून, या जाचाला कंटाळून काही कर्जदारांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.