फायद्याचे पीक आणि तोट्याचे पीक !

शेअर बाजारात हल्ली बरेच दिवस शेअरचे भाव तांबड्या रंगात दिसत आहेत
share market mutual fund finance money management
share market mutual fund finance money management sakal
Summary

शेअर बाजारात हल्ली बरेच दिवस शेअरचे भाव तांबड्या रंगात दिसत आहेत

शेअर बाजारात हल्ली बरेच दिवस शेअरचे भाव तांबड्या रंगात दिसत आहेत. दिवसेंदिवस ते जास्त तांबडे होत आहेत. ‘शेअरच्या बागेत’ क्वचितच एखादे झाड हिरवे दिसत आहे! बागेचे मालक सुन्न होऊन बसले आहेत.

खरा दर्दी माळी अशा परिस्थितीतही संधी शोधत असतो. जसजसे शेतात उत्तम पाऊसपाणी झाल्यानंतर ‘फायद्याचे पीक’ दिसू लागते, तसतसे शेतकरी त्याचा पैसा करू लागतो. हा पैसा वाढत वाढत जातो.

मात्र ‘शेअररुपी’ पैशावर भांडवली कर लागू होत असल्याने, हा दर्दी माळी कर कमी कसा करता येऊ शकेल, याच्या विवंचनेत असताना, त्याला ‘तोट्याच्या पिका’ची (लॉस हार्वेस्टिंग) साथ मिळते आणि तो ‘फायद्याच्या पिका’ची रुजवात ‘तोट्यातील पिका’शी घालू शकतो, हे कळते.

दीर्घ मुदतीचा भांडवली नफा आणि कर आकारणी

प्रमाणित शेअर किंवा म्युच्युअल फंड १२ महिन्यांच्या मुदतीनंतर विकल्यास होणाऱ्या फायद्यावर १०.४० टक्के, दीर्घ मुदतीचा भांडवली कर-उपकर भरावा लागतो. मात्र, पहिल्या एक लाख रुपयांच्या फायद्यावर १०० टक्के सूट आहे.

बिनप्रमाणित शेअर किंवा फंड विक्रीच्या फायद्यावर मात्र २०.८० टक्के भांडवली कर-उपकर पडेल. येथे ‘इंडेक्सेशन’चा फायदा घेता येऊ शकतो. मात्र एक लाखाची सूट येथे लागू होत नाही. दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्याची दीर्घ मुदतीच्या तोट्याबरोबरच रुजवात घालता येते.

अल्प मुदतीचा भांडवली नफा

प्रमाणित शेअर किंवा म्युच्युअल फंड १२ महिन्यांच्या आत विकून होणाऱ्या फायद्यावर १५.६० टक्के भांडवली कर-उपकर द्यावा लागतो. येथे सूट नाही. स्लॅब रेटप्रमाणे भांडवली कर-उपकर द्यावा लागेल.

अल्प मुदतीच्या भांडवली नफ्याची रूजवात अल्प मुदतीच्या भांडवली तोट्याबरोबर किंवा दीर्घ मुदतीच्या तोट्याबरोबर घालावी लागते.

भांडवली कर कसा वाचविता येऊ शकेल?

‘फायद्याच्या पिका’चा ‘तोट्याच्या पिका’शी मेळ घालून दीर्घकालीन किंवा अल्पकालीन भांडवली नफा कमी किंवा शून्यावरदेखील आणता येतो. एवढेच नव्हे, तर ‘तोट्याचे पीक’ हे ‘फायद्याच्या पिका’पेक्षा जास्त झाल्यास, जास्त ‘तोट्याचे पीक’ पुढे आठ वर्षे (कॅरी फॉरवर्ड) ओढता येऊ शकते.

उदाहरणार्थ,

शेखर शेअर बाजाराचा अभ्यासक आणि गुंतवणूकदार आहे. समजा त्याने २० मार्चपर्यंत काही शेअर विकून रु. १.४० लाख रुपयांचे ‘फायद्याचे पीक’ घेतले आहे. त्याला ४०,००० रुपयांवर १०.४० टक्के भांडवली कर-उपकर पडणार आहे. पण तो कर-उपकर वाचवायचा असेल, तर त्याला ५०,००० रुपयांचे ‘तोट्याचे पीक’ घेऊन भांडवली नफा ९०,००० रुपयांवर आणता येऊ शकेल. (१.४० लाख वजा ५०,०००).

त्यामुळे एक लाख रुपयांच्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर नसल्याने त्याला काहीच कर पडणार नाही. मात्र, ‘तोट्याचे पीक’ घ्यायला त्याला काही शेअर तोट्यात विकावे लागतील. असे विकायचे शेअर कायम तोटा दाखविणारे असल्यास बरे किंवा चांगले शेअर तोट्यात विकून लगेच परत घेतल्यासही ‘तोट्याचे पीक’ घेता येऊ शकेल. शिवाय तेच शेअर ‘फायद्याच्या पिका’साठी तयार ठेवता येऊ शकतील.

तोटा दाखविणारे शेअर

हल्लीच्या दिवसात जेव्हा शेअर बाजार अदानी संकटामुळे पडलेला असल्यामुळे जवळजवळ सर्वच शेअर कमी-जास्त तोटा दाखवित आहेत. ते विकून आणि तोटा नोंदवून कर वाचवता येईल. आणि पुन्हा हेच शेअर परत त्याच किंवा कमी किंमतीत घेऊन पुढच्या वर्षाची तजवीज करता येऊ शकते किंवा दुसरा फायदा म्हणजे ‘रोकड राजा’ तत्त्वाप्रमाणे आपल्याकडे नसलेले चांगले शेअर कमी किमतीत घेण्यास ही ‘कॅश’ उपयोगी पडू शकते!

पुढच्या वर्षाची सुरुवात पुढे ओढलेल्या ‘तोट्याच्या पिका’ने करा. न जाणो पुढचे वर्ष अधिक ‘फायद्याचे पीक’ देणारे असू शकेल. नसेल तर आपले वरचे गणित आहेच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com